सोमवारी शेअर बाजारात पसरलेल्या NDTV बद्दलच्या एका वृत्तामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांचं अपर सर्किट लागल्याचं पाहायला मिळालं. अदानी समूह एनडीटीव्हीचं अधिग्रहण करू शकतं अशी अफवा शेअर बाजारात तेजीनं पसरली होती. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये अदानी समूह दिल्लीतील एका मीडिया हाऊसचं अधिग्रहण करू शकतो असं म्हटलं होतं. त्यानंतर अनेकांनी याचा संबंध एनडीटीव्हीशी जोडला होता. एनडीटीव्हीची आर्थिक स्थिती तितकी चांगली नसल्याचं म्हटलं जात आहे. तसंच कंपनीचे प्रमोटर यांचीदेखील टॅक्सचा तपास सुरू आहे. परंतु गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये १३० टक्क्यांची तेजी आली आहे.
मुंबई शेअर बाजारात एनडीटीव्हीच्या शेअर्सची किंमत ७.२० रूपयांनी वाढून ७९.६५ रूपयांवर पोहोचली. तर राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ७.२५ रूपयांची वाढ होऊन ती ७९.८५ वर पोहोचली. एनएसई आणि बीएसई दोन्हीवर शेअर्सना १० टक्क्यांचं अपर सर्किट लागल्याचं पाहायला मिळालं.
माध्यम क्षेत्रात अदानी समूह एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. Adani Enterprises ने काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार संजय पुगलिया यांची आपल्या समूहाच्या मीडिया इनिशिएटिव्ह्सला लीड करण्यासाठी सीईओ आणि एडिटर इन चीफ या पदी नियुक्ती केली होती.