Online Order : गेल्या काही वर्षात ई कॉमर्स कंपन्यांची होम डिलिव्हरी सेवा लोकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. अशा परिस्थितीत ब्लिंकिट, झेप्टो, इंस्टामार्ट सारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मने जीवन खूप सोपे केले आहे. कुठलीही वस्तू तुम्ही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून १० मिनिटांच्या आत घरपोच मागवू शकता. क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर केल्यानंतर वस्तूची एक्सपायरी डेट बहुतेक लोक तपासत नाहीत. तुम्हीही असे करत असाल तर आताच सावध व्हा. अन्यथा एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.
धक्कादायक माहिती समोर
या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांच्या आरोग्याशी आणि खिशाशी खेळ खेळला जात आहे. ब्लिंकिट, झेप्टो, इंस्टामार्ट सारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना वितरित केलेल्या पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टँडर्सवर लक्ष दिले जात नाही. या प्लॅटफॉर्मवर एक्सपायरी जवळ असलेल्या उत्पादनांची डिलिव्हरी झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्यांच्याकडून वस्तू मागवत असाल, तर उत्पादनांची काळजीपूर्वक तपासणी करा आणि त्यांच्यावरील एक्सपायरी आणि इतर तपशील तपासा.
सर्व प्लॅटफॉर्मसोबत फूड रेगुलेटरची बैठक
यापूर्वी ७ नोव्हेंबर रोजी FSSAI CAC बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. या बैठकीत राज्यांना अशा प्लॅटफॉर्मचे गोदामांवर निरीक्षण करण्यावर आणि प्लॅटफॉर्मसाठी एसओपी तयार करण्यावर चर्चा झाली. मंगळवारी सर्व प्लॅटफॉर्मसोबत अन्न नियामकाची बैठक आहे. या बैठकीत शेल्फ लाइफ आणि इतर प्रोटोकॉलवर चर्चा केली जाईल. याशिवाय, अन्न सुरक्षा प्रोटोकॉलकडे सतत दुर्लक्ष करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाऊ शकतात.
वस्तू तपासूनच घ्या
तुम्ही जर अशा प्लॅटफॉर्मवरुन अन्न मागवत असाल तर जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कारण, याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होणार आहे. शिजवलेले अन्न असले तरी त्याचा दर्जा तपासल्याशिवाय त्याचे ग्रहन करू नका. शक्यतो खात्रीशीर रेस्टॉरंटमधून अन्न मागवण्याचा प्रयत्न करा. आकर्षक ऑफर्स पाहून कुठल्याही अनोळखी ठिकाणाहून अन्न मागवू नका.