Join us

निर्यातवाढीकडे लक्ष द्यावे लागेल - मोहन कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 4:32 AM

गेली काही वर्षे देशाच्या निर्यातीमध्ये सातत्याने घट नोंदविण्यात येत आहे.

पुणे : गेली काही वर्षे देशाच्या निर्यातीमध्ये सातत्याने घट नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे आयात आणि निर्यातीच्या तफावतीकडे लक्ष द्यावे लागेल. त्याच्या जोडीला देशातील गरिबी निर्मूलनासाठी धोरण हाती घेण्याची गरज असल्याचे मत भारताचे फ्रान्समधील राजदूत डॉ. मोहन कुमार यांनी येथे व्यक्त केले.परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) वतीने २९ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत आयोजित ‘एशिया इकॉनॉमिक डायलॉग’ परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आयात आणि निर्यातीची योग्य सांगड घातली जावी. निर्यात वाढली पाहिजेच. तसेच, आयातदेखील तितकीच देशासाठी जरुरी आहे. मात्र आपण आयात कोणत्या वस्तूंची करतो, याचे भान ठेवले पाहिजे. दिवाळीच्या वस्तू जर आपण चीनकडून आयात करीत असून, तर ते हास्यास्पद आहे. देशातील कारागिरांच्या मालाचे अशा वेळी वितरण व्हायला हवे. त्याच जोडीला आपल्या देशासमोर गरिबी ही मोठी समस्या आहे. चीनने गरिबी निर्मूलन करण्यात यश मिळवले आहे. गरिबी निर्मूलन म्हणजे दिवसाला अमुक कॅलरी अन्न देणे असे नव्हे. त्यामुळे सध्या सुरू असलेली चीन-भारत तुलना योग्य नाही. कारण चीनची अर्थव्यवस्था १४ ट्रिलियन डॉलर असून, भारताची २.६ ते २.७ ट्रिलियन डॉलर असल्याचे डॉ. कुमार म्हणाले.