नागपूर : एखादे नवे तंत्रज्ञान प्रयोगशाळेत विकसित करणे एकवेळ सोपे होईल, मात्र ते तंत्रज्ञान उद्योगापर्यंत पोहचविणे आणि व्यावसायिक उपयोगात आणणे २० पटीने कठीण असते. दुसरीकडे नवे तंत्रज्ञान लघुउद्योगापर्यंत पोहचत नसल्याने हे उद्योग स्पर्धेमध्ये मागे पडत जातात. त्यामुळे प्रयोगशाळेत विकसित झालेले तंत्रज्ञान लघुउद्योगापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी), विज्ञान भारती आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए) यांच्या संयुक्त विद्यमाने इंडस्ट्रीज, इनोव्हेशन, एन्टरप्रीनर, फॅसिलिटेटर अँड अॅकेडमिया (आयफा) कॉन्फरन्स २०१६ च्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. सारवत, टी. करुणाकरन, व्हीएनआयटीचे चेअरमेन विश्राम जामदार, विज्ञान भारतीचे जयंत सहस्रबुद्धे, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, नरेंद्र चौधरी, पी.पी. जोशी, श्रीराम जोतिषी, परिषदेचे संयोजक संजय वटे, एम.के. तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. काकोडकर यांनी सांगितले की, लघुउद्योजकांच्या अडचणी सांगून उद्योग धोरणाबाबत शंका उपस्थित केली. तंत्रज्ञान हे नेहमी बदलत राहते. उद्योजकांना जुन्या तंत्रज्ञानाच्या मदतीने स्पर्धेत टिकणे शक्य होणार नाही. त्यामुळे नवनवे तंत्र लघुउद्योगापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. दुसरीकडे आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्यापलीकडे काम करण्याची आपण इच्छा करीत नाही. अभियांत्रिकीचे विद्यार्थी किंवा प्रशिक्षकही आपल्या क्षेत्राशिवाय इतरत्र काम करीत नाही. उद्योजकांची स्थितीही याहून वेगळी नाही. ही संस्कृती चुकीची आहे.