नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकमला 12,700 कोटी रुपयांचा घोटाळा करुन विदेशात फरारी झालेला भारतातील हिरे व्यापारी नीरव मोदी लंडनमध्ये असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. नीरव मोदीचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असला तरी सध्या तो सिंगापुरच्या पासपोर्टवर विदेशात मुक्तपणे फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा भाऊ निशाल मोदी आणि बहीण पुर्वी मेहता यांच्याकडे बेल्जियमचे पासपोर्ट आहेत.
पुर्वीचा नवरा मयंक मेहता याच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट असून तो सध्या न्युयॉर्क ते हॉंगकॉंगच्या फेऱ्या मारीत आहे असेही समोर आले आहे. नीरवचे वडील दीपक मोदी, भाऊ निशाल मोदी, बहीण पूर्वी मेहता आणि तिचा पती मयांक मेहता यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. नीरवचा अमेरिकास्थित व्यावसायिक भागीदार मिहीर भन्साळी याचाही समन्स बजावण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. नीरवचे व्यवसाय आणि आर्थिक व्यवहार त्यांच्याशी जोडले गेलेले असल्याने त्यांची चौकशी आवश्यक असल्याचे ईडीने म्हटले आहे. समन्स बजावण्यात आलेले पाचही जण परदेशांत राहतात. त्यामुळे त्यांना ई-मेलच्या माध्यमातून समन्स बजावण्यात आले.
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्टच्या (पीएमएलए) अंतर्गत ही प्रक्रिया करण्यात आली. दीपक मोदी बेल्जियममध्ये, मेहता दाम्पत्य हॉंगकॉंगमध्ये तर निशाल आणि भन्साळी अमेरिकेत असल्याचा अंदाज आहे. याआधी ईडीने नीरव आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांना समन्स बजावले होते. मात्र, व्यावसायिक कामे आणि पासपोर्ट स्थगितीची कारणे देत त्यांनी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे टाळले.
कोण आहे नीरव मोदी -
नीरव मोदीची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. त्याला 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. 47 वर्षीय नीरवचे वडील देखील हिरेव्यापारीच होते. नीरव वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला. नीरवला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.
काय आहे प्रकरण -
सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. घोटाळ्यात संशयित असलेले बडे व प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झाला. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत हा घोटाळा झाल्याचे काल उघड झाले. हिरे व्यापारी नीरव मोदीने आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पँजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आज शेअर बाजारात बँकेचे शेअर जोरदार कोसळले. त्यामुळे पीएनबीने मुंबई शेअर बाजाराला पत्र लिहिलं. घोटाळ्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सक्तवसुली संचलनालयाने याप्रकरणी घोटाळ्याचा सुत्रधार आणि प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी याच्या कार्यालयांवर छापेमारी सुरु झाली आहे. नीरव मोदी याच्या मुंबईतसहित तीन शहरांमधील शोरुम आणि कार्यालयांवर छापेमारी झाली आहे .