मुंबई : पैशांचे ऑनलाईन हस्तांतरण करण्यासाठी वापरली जाणारी एनईएफटी सेवा येत्या शनिवारी मध्यरात्रीपासून १४ तासांसाठी बंद राहणार असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. तांत्रिकदृष्ट्या यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्याचे काम सुरू राहणार असल्याने ही यंत्रणा बंद ठेवली जाणार आहे.
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (एनईएफटी) या यंत्रणेचे व्यवस्थापन भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे केले जाते. या सेवेची प्रणाली तांत्रिकदृष्ट्या मजबूत करण्याचे काम शनिवारी मध्यरात्रीनंतर केले जाणार आहे. या कारणाने शनिवार-रविवारच्या (२३ मे) रात्री १२ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत १४ तास ही सेवा बंद राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने कळविले आहे. या काळामध्ये आरटीजीएस प्रणाली सुरूच राहणार असल्याचेही बँकेने जाहीर केले आहे.