नवी दिल्ली : नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रानस्फर (एनईएफटी)द्वारे अन्य व्यक्तीच्या खात्यात रक्कम जमा करणे सोमवारपासून अधिक सोपे झाले आहे. आता ही सेवा २४ तास सुरू झाली आहे. त्यामुळे दिवसा वा रात्री कधीही हे आर्थिक व्यवहार करता येणार आहेत.
याआधी केवळ बँकेच्या कामकाजाच्या वेळेतच एनईएफटी सेवा सुरू होती. त्यामुळे बँका बंद झाल्यावर कोणतेही आर्थिक व्यवहार या माध्यामातून करता येत नसत. सकाळी ८ ते दुपारी या वेळेतच प्रामुख्याने हे व्यवहार केले जात. रविवारी व सुटीच्या दिवशीही या सेवेचा उपयोग होत नसे. आता मात्र आठवड्याचे सातही दिवस व २४ तास ही सेवा सुरू राहणार आहे. या सेवेद्वारे एका वेळी दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम आॅनलाइन पद्धतीने अन्य खात्यांत जमा करता येतात.
एनईएफटीद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात अर्ध्या तासामध्ये रक्कम जमा होते. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे यापुढे कोणत्याही वेळेत असा आर्थिक व्यवहार केल्यास अर्ध्या तासामध्ये संबंधिताच्या खात्यात दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा होईल.
आरबीआयचे नियंत्रण
ही सेवा २४/७ सुरू करण्याची घोषणा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने आॅगस्ट महिन्यातच केली होती. त्यानुसार रविवारी मध्यरात्रीनंतर ती प्रत्यक्षात आली. मात्र त्यानंतर वा सोमवारी दिवसभरात किती लोकांनी एनईएफटीमार्फत आर्थिक व्यवहार केले, हे समजू शकले नाही. एनईएफटीची सेवा २00५ मध्ये सुरू करण्यात आली. या सेवेवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असते.