अडचणीतील वाहन उद्योगाला सवलती आणि १० बॅँकांचे विलिनीकरण यामुळे बाजारावर सकारात्मक परिणाम होण्यापेक्षा घसरणारी अर्थव्यवस्था आणि अमेरिका-चीन दरम्यानचे व्यापारयुद्ध याचा नकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणात झाला. त्यातच परकीय वित्तसंस्थांनी गुंतवणूक काढून घेण्याला पसंती दिल्याने शेअर बाजारात गतसप्ताह नकारात्मक राहिला. स्मॉलकॅपमध्ये मात्र वाढ झाली.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ घसरणीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३७,१८१.७६ अंशांवर खुला झाला. त्यानंतर सप्ताहामध्ये तो ३७,१८८.३८ ते ३६,४०९.५४ अंशांदरम्यान हेलकावत सप्ताहाच्या अखेरीस ३६,९८१.७७ अंशांवर स्थिरावला. मागील सप्ताहाच्या तुलनेत तो ३५१.०२ अंश (०.९४ टक्के) खाली येऊन बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजारातही निराशेचेच वातावरण राहिले. येथील निर्देशांकात (निफ्टी) सप्ताहामध्ये ७७.०५ अंशांची घट होऊन तो १०,९४६.२० अंशांवर बंद झाला. निफ्टीने ११ हजार तर सेन्सेक्सने ३७ हजार अंशांची पातळी सोडल्याने बाजारावर काहीसा मानसिक दबाव आला आहे.क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये या सप्ताहात मिश्र उलाढाल बघावयास मिळाली. मिडकॅप १०२.९२ अंश (०.७६ टक्के) कमी होऊन १३,३६४.६३ अंशांवर बंद झाला. बाजारात घसरण दिसत असताना स्मॉलकॅप या निर्देशांकाने मात्र सलग दुसऱ्या सप्ताहात आगेकूच केली आहे. हा निर्देशांक १२,५९४.५९ अंशांवर (वाढ १७३.५६ अंश) बंद झाला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचा घटलेला विकासदर तसेच अमेरिका आणि चीन यांच्यातील तीव्र होत असलेले व्यापार युद्ध याचा परिणाम भारतात जाणवला. जगभरातील शेअर बाजारांमध्येही मंदीचे वातावरण राहिले. त्यामुळेही भारतीय बाजारांवर विक्रीचे दडपण आले. अडचणीतील वाहन उद्योगाला राज्य सरकारशी संपर्क साधण्याबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी केलेली सूचना ही या उद्योगामध्ये आणखी चिंता वाढविणारी ठरली आहे.