ट्रम्प यांनी शुल्काबाबत नरमाईची भूमिका घेतल्यानं जगभरातील शेअर बाजारातील पुन्हा तेजी आलीच, शिवाय अब्जाधीशांचं झालेलं नुकसानही काही प्रमाणात भरून निघण्यास सुरुवात झाली आहे. २०२५ मध्ये एअरटेलचे सुनील मित्तल यांनी अदानी आणि अंबानी यांना मागे टाकत सर्वाधिक कमाई केली आहे. मित्तल यांच्या संपत्तीत यंदा ४.३० अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. आता त्यांची संपत्ती २८.२ अब्ज डॉलर्स इतकी आहे. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्समध्ये मित्तल ६४ व्या स्थानावर आहेत. या यादीत ९६ व्या क्रमांकावर असलेले राधाकृष्ण दमानी कमाईच्या बाबतीत सुनील मित्तल यांच्या मागे आहेत. त्यांच्या संपत्तीत यंदा ४.२९ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती २०.६ अब्ज डॉलर आहे.
अदानी आणि अंबानी आता या वर्षीच्या टॉप लूझरच्या यादीतून आता गेनर्सच्या लिस्टमध्ये आले आहेत. जगातील २० व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांची संपत्ती ७९.६ अब्ज डॉलर्स असून यावर्षी त्यांची संपत्ती ९०० मिलियन डॉलर्सनं वाढली आहे. अंबानींबद्दल बोलायचे झाले तर ते ९४.१० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत १६ व्या क्रमांकावर आहेत. या वर्षी त्यांच्या संपत्तीत ३.५४ अब्ज डॉलर्सची वाढ झाली.
मस्क, बेझोस दोघंही यादीत नाही
जगातील सर्वात श्रीमंत इलॉन मस्क आणि जेफ बेझोस हे दोघेही या यादीत नाहीत, कारण मस्क यांना यावर्षी १२२ अब्ज डॉलर्सचं सर्वाधिक नुकसान सहन करावं लागलंय, तर जेफ बेजोस यात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या संपत्तीतही ३६.६ अब्ज डॉलरची घट झाली आहे. जगातील टॉप-१० श्रीमंतांच्या यादीत अमेरिकेचे प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे हे एकमेव गेनर आहेत.
चीनच्या अब्जाधीशांना सर्वाधिक फायदा
या अमेरिका-चीन व्यापार आणि शुल्क युद्धाचा सर्वाधिक फायदा चीनच्या अब्जाधीशांना झालाय. जगभरातील अब्जाधीशांमध्ये त्यांचं वर्चस्व वाढलंय. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, यावर्षी कमाईतील पहिल्या २० अब्जाधीशांपैकी आठ अब्जाधीश चीनमधील आहेत. चीनचे अब्जाधीश झांग यिमिंग हे या वर्षी सर्वाधिक कमाई करणारे तिसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. यंदा त्यांच्या संपत्तीत १३.६ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ५७.५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते आता जगातील २५ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.