अमेरिकेत सर्वाधिक पगार घेणाऱ्या भारतीय वंशाच्या सीईओंच नाव विचारलं आणि तुम्ही सुंदर पिचाई किंवा सत्या नडेला यांचं नाव सांगाल. परंतु हे चुकीचं आहे. पालो ऑल्टो नेटवर्क्सचे सीईो निकेश अरोरा हे अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणाऱ्या सीईओंच्या यादीत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेतील सर्वाधिक पगार घेणाऱ्या पहिल्या दहा सीईओंच्या यादीत केवळ एका भारतीय वंशाच्या सीईओला स्थान मिळालं आहे.
सी-सूट कॉम्पच्या अहवालानुसार, पालो ऑल्टो नेटवर्क्सचे सीईओ आणि चेअरमन निकेश अरोरा अमेरिकेतील सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत दहाव्या स्थानावर आहेत. डेटा अॅनालिटिक्स फर्म सी-सूट कॉम्पनं अमेरिकेतील सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंची एक यादी जाहीर केली आहे.
दोन निकषांवर आधारित दोन याद्या
सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सीईओंच्या नावांच्या दोन याद्या दोन निकषांच्या आधारे जाहीर करण्यात आल्यात. भारतीय वंशाचे आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना किंवा मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला यांना कोणत्याही यादीत स्थान नाही. दुसरीकडे पालो अल्टो नेटवर्क्सचे ५६ वर्षीय निकेश अरोरा यांनी या दोन्ही यादीत स्थान मिळवलं आहे.
बीएचयूमधून इंजिनीअरिंगचं शिक्षण
अरोरा यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या (आता आयआयटी-बीएचयू) इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यांनी नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटीमधून एमबीए आणि बोस्टन कॉलेजमधून एमएससी केलं आहे. २०१८ मध्ये पालो ऑल्टो नेटवर्क्सच्या सीईओ पदाची जबाबदारी सांभाळण्यापूर्वी निकेश अरोरा यांनी गूगल आणि सॉफ्टबँक समूहातही काम केलंय.
अरोरा यांनी गुगलमध्ये उच्च दर्जाच्या पदावर १० वर्षे काम केले. २०१४ मध्ये त्यांनी सॉफ्टबँक समूहाचे अध्यक्ष आणि सीओओ म्हणून रुजू होण्यासाठी राजीनामा दिला. टी-मोबाइल आणि भारती एअरटेल, युरोप मध्येही त्यांनी सेवा बजावली आहे.