नवी दिल्ली-
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि नेस्ले इंडिया (Nestle) या दोन दिग्गज कंपन्यांनी त्यांच्या विविध उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. या उत्पादनांमध्ये चहा, कॉफी, दूध आणि नूडल्स यांचा समावेश आहे. नेस्ले इंडियाने 'मॅगी' नूडल्सच्या किमती ९ ते १६ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. मॅगी मसाला नूडल्सचा ७० ग्रॅम पॅक आता १२ रुपयांऐवजी १४ रुपयांना मिळणार आहे. मॅगी मसाला नूडल्स १४० ग्रॅम पॅकच्या किंमतीत ३ रुपये म्हणजेच १२.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ५६० ग्रॅम पॅकची किंमत ९.४ टक्क्यांनी वाढली आहे, म्हणजेच तुम्हाला आता या पॅकसाठी ९६ रुपयांऐवजी १०५ रुपये मोजावे लागतील.
मॅगी व्यतिरिक्त नेस्ले इंडियानेही दूध आणि कॉफी पावडरच्या दरात वाढ केली आहे. कंपनीच्या A+ दुधाच्या १ लिटर कार्टनची किंमत पूर्वी ७५ रुपयांवरून ४ टक्क्यांनी वाढून ७८ रुपये झाली आहे. नेसकॅफे क्लासिक कॉफी पावडरच्या दरातही तीन ते सात टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. Nescafe Classic 25 gm पॅकची किंमत २.५ टक्क्यांनी वाढून ८० रुपये करण्यात आली आहे, जी पूर्वी ७८ रुपये होती. आता तुम्हाला Nescafe Classic 50 gm पॅकसाठी १४५ रुपयांऐवजी १५० रुपये द्यावे लागतील.
HUL ने कोणत्या उत्पादनाची किंमत किती वाढवली?
HUL ने ब्रू कॉफी पावडरच्या किमती ३ ते ७ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. ब्रू गोल्ड कॉफी जारच्या किमतीत ३-४ टक्के आणि ब्रू इन्स्टंट कॉफी पाऊचच्या किमतीत ३ ते ६.६६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ताजमहाल चहाची किंमत ३.७ टक्क्यांवरून ५.८ टक्के करण्यात आली आहे. याशिवाय, ब्रुक बाँडचे विविध प्रकार १.५ टक्क्यांवरून १४ टक्क्यांपर्यंत महाग झाले आहेत. वाढत्या महागाईमुळे उत्पादनाच्या किमतीत वाढ करण्याचे पाऊल उचलल्याचे एचयूएलचे म्हणणे आहे. त्याच्या उत्पादनांच्या नवीन किमती १४ मार्चपासून लागू झाल्या आहेत.