Nestle India Kitkat: बहुराष्ट्रीय कंपनी 'नेस्ले'नं (Nestle) आपल्या एका चॉकलेट उत्पादनाच्या पाकिटावर देवाचा फोटो छापल्याप्रकरणी जाहीर माफीनामा सादर केला आहे. यासोबतच संबंधित घटनेची दखल घेत देवाचा फोटो छापण्यात आलेले सर्व चॉकलेट्स बाजारातून मागे घेण्यात येत असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.
नेस्लेच्या 'किटकॅट' (KitKat) ब्रँडच्या चॉकलेट रॅपरवर भगवान जगन्नाथ यांचा फोटो छापण्यात आल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती. ट्विटरवर अनेक युझर्सनं यावर आक्षेप नोंदवला. चॉकलेट खाऊन झाल्यानंतर लोक चॉकलेटचा कागद रस्त्यावर, कचऱ्याच्या डब्यात किंवा इतरत्र टाकून देतात. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. कंपनीनं आपल्या किटकॅट चॉकलेटचं रॅपरवरुन भगवान जगन्नाथ, भगवान बालभद्र आणि माता सुभद्रा यांचा फोटो तातडीनं हटवावा, अशी मागणी युझर्सकडून केली जात होती.
ट्विटरवर याचा जोरदार ट्रेंड झाल्यानंतर नेस्ले कंपनीनंही याची दखल घेतली आहे. नेस्लेनं ट्विटरवर माफीनामा जाहीर केला असून देवांचा फोटो छापण्यात आलेली चॉकलेट रॅपर मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ट्रॅव्हल ब्रेक पॅकचा उद्देश स्थानिक पर्यटन स्थळं आणि तेथील सुंदरता सर्वांसमोर यावी यासाठी असे रॅपर तयार करण्यात आले होते. याच गोष्टीचा विचार करुन गेल्यावर्षी ओदिशाच्या सांस्कृतिक कला सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ओदिशाचं वैशिष्ट्य असलेली Pattachitra डिझाईनचं पॅकेट तयार करण्यात आलं होतं, असं कंपनीनं आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.
घटनेचं गांभीर्य लक्षात घेत माफीनामाचॉकलेट रॅपवर लावण्यात आलेला फोटो सरकारच्या पर्यटन संकेतस्थळावरुन घेतल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. आम्ही ही कला आणि त्याच्याशी निगडीत कलाकारांबाबत अधिक लोकांपर्यंत याची माहिती पोहोचावी यासाठी प्रयत्नशील होतो. आम्ही आजवर केलेली मार्केटिंग पाहता ग्राहक अशा सुंदर डिझानचे रॅपर स्वत:कडे जपून ठेवतात असं दिसून आलं होतं. पण आम्ही या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं आहे. आमच्याकडून चुकूनही कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर सर्वांची माफी मागतो, असं कंपनीनं माफीनाम्यात म्हटलं आहे.