(करनीती भाग ३३८)
सीए - उमेश शर्मा
अर्जुन : कृष्णा, केंद्र्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्र्यांनी जाहीर केलेल्या कोविड इकोनॉमिक्स रिलिफ पॅकेजनुसार टीडीएस आणि टीसीएस दरामध्ये काय दिलासा दिला आहे?
कृष्ण : अर्जुना, कोविड-१९ साथीच्या रोगाचा प्रसार होत असल्याने पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे करदात्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे टीडीएस-टीसीएस दरामध्ये २५ टक्के घट केली आहे. त्यामुळे ५ हजार कोटी रुपयांची रोखता निर्माण होईल. सीबीडीटीने १३ मे २०२० रोजी परिपत्रक जारी केले असून, टीडीएस आणि टीसीएस दराचे तपशील दिले आहेत.
अर्जुन : कृष्णा, कमी झालेले टीडीएस-टीसीएस दर सर्व प्रकारच्या पेमेंट्ससाठी लागू आहेत का?
कृष्ण : अर्जुना, कमी झालेले टीडीएस-टीसीएसचे दर १४ मे २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीसाठी लागू आहेत. कमी झालेले दर केवळ रहिवाशांना केलेल्या ठरावीक पेमेंटवरच लागू होतील. पॅन-आधार न दाखल केल्याने जास्त दराने कर वजा करावा लागतो. त्या दरामध्ये कोणतीही घट केली नाही.
अर्जुन : कृष्णा, असे कोणते ठरावीक पेमेंट आहेत, त्यावर कमी केलेले करदर लागू होतील?
कृष्ण : असे काही सामान्य प्रमुख स्पेसिफाईड पेमेंट्स आहेत. त्यावर १४ मे २०२० नंतर कमी केलेले करदर लागू होतील. परिपत्रकात कमी केलेल्या करदरासह आताच्या करदरांचा उल्लेख चौकटीमध्ये केलेला आहे.
अर्जुन : कृष्णा, असे कोणते पेमेंट्स-रिसिट ज्यावर कमी झालेले टीडीएस-टीसीएस दर लागू होणार नाहीत ?
कृष्ण : अर्जुना, वेतनदायित्व, ईपीएफमधून पैसे काढणे, लॉटरी आणि अश्व शर्यतीमधून पैसे जिंकणे यासाठी कमी झालेला टीडीएस दर लागू होणार नाही. त्याचप्रमाणे मद्यविक्री, परदेश दौरा, कार्यक्रम पॅकेज यासाठी कमी झालेले टीसीएसचे दर लागू होणार नाहीत.
अर्जुन : यामधून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, कमी झालेल्या टीडीएस-टीसीएस दराचा करदात्यांच्या कॅश फ्लो वर सकारात्मक परिणाम होईल. परंतु हे लक्षात घेणे गरजेचे आहे, की अंतिम करदायित्वावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे करदात्यास आगाऊ कराची पुन्हा गणना करून त्यानुसार आगाऊ कर भरणे गरजेचे आहे. आगाऊ कर भरण्यामध्ये कमतरता राहिल्यास त्यावर कलम २३४ बी आणि २३४ सी अंतर्गत व्याज भरावे लागेल.
कलम पेमेंट स्वरूप टीडीएस-टीसीएस दर (%)
जुने दर नवीन दर
१९४ ए व्याज (बँकिंग, सहकारी बॅँक, पोस्ट आॅफिस) १० ७.५
१९४सी व्याज (वैयक्तिक, एचयूएफला केलेले पेमेंट) १ ०.७५
इतर २ १.५०
१९४ फ कमिशन/ब्रोकरेज ५ ३.७५
१९४ आयए भाडे (यंत्रसामग्री/उपकरणे) २ १.५०
भाडे (जमीन, इमारत, फर्निचर, वस्तू) १० ७.५
१९४ आयए शेतजमीन सोडून इतर स्थावर संपत्ती हस्तांतर १ ०.७५
१९४ जे व्यावसायिक शुल्क १० ७.५
२०६ सी (१) स्क्रॅप १ ०.७५
२०६ सी (१फ) १० लाखांच्या वर मोटारवाहन विक्री १ ०.७५
(टीप : आणखी काही बदलांसाठी परिपत्रक पाहावे)
टीडीएस-टीसीएस दरामधील नव्याने झालेले बदल
असे कोणते पेमेंट्स-रिसिट ज्यावर कमी झालेले टीडीएस-टीसीएस दर लागू होणार नाहीत ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 11:09 PM2020-05-17T23:09:29+5:302020-05-17T23:09:52+5:30