Reliance Brand : रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांनी Reliance नावाला भारतासह जगभरात एक ब्रँड बनवले. त्यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यात Reliance नावाच्या वापरावरुन मोठा वाद झाला. शेवटी या वादात त्यांच्या आईने मध्यस्थी करुन दोन्ही भावांना Reliance नाव वापरण्याची परवानगी दिली. आता या नावावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. Reliance चे नाव वापरल्याप्रकरणी अनिल अंबानी यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (NCLT) हिंदुजा ग्रुपची (Hinduja Group) तक्रार केली आहे.
रिलायन्स कॅपिटलचे नाव वापरू नका
अनिल अंबानींच्या मालकीच्या अनिल धीरुभाई अंबानी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने NCLT मध्ये दाखल केलेल्या याचिकेत हिंदुजा समूहाच्या मालकीच्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्सला रिलायन्सचे नाव वापरण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या रिलायन्स कॅपिटलच्या रिझोल्यूशन प्लॅनची अंमलबजावणी केल्यानंतर रिलायन्स हे नाव न वापरण्याची सूचना कंपनीला देण्यात यावी. एनसीएलटी मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी करणार आहे.
हिंदुजा ग्रुपने रिलायन्स कॅपिटलचे अधिग्रहण केले
हिंदुजा ग्रुपने अलीकडेच कर्जदारांचे 9,641 कोटी रुपये देऊन रिलायन्स कॅपिटलचे अधिग्रहण केले होते. रिलायन्स कॅपिटल 25 हजार कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरली होती. हिंदुजा ग्रुपने लिलावा प्रक्रियेतून रिलायन्स कॅपिटलला विकत घेतले होते. दरम्यान, या कराराला मंजुरी देताना NCLT ने फेब्रुवारीमध्ये निर्देश दिले होते की, हिंदुजा ग्रुप 3 वर्षांसाठी रिलायन्सचे नाव वापरू शकतात. पण, आता अनिल अंबानी यांनी याला विरोध दर्शवला आहे.
फक्त अंबानी कुटुंब रिलायन्स नाव वापरू शकते
रिलायन्स ब्रँडचा वापर केवळ अंबानी कुटुंबीयच करू शकतात, असे याचिकेत म्हटले आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीची जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लवकरच देशात आर्थिक सेवा सुरू करणार आहे. अशा परिस्थितीत अंबानी बंधूंशिवाय इतर कोणालाही रिलायन्सचे नाव वापरण्याची परवानगी देऊ नये. नाव वापरण्याची परवानगी देताना त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली नाही, असे याचिकेत म्हटले आहे.