मुंबई: 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांनी शेअर मार्केटसोबतच आता एव्हिएशन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पुढील वर्षी 2022 त्यांची अकासा एअर (Akasa Air) एअरलाईन्स कार्यान्वित होणार आहे. दरम्यान, त्यांच्या एअरलाईन्सच्या नव्या डिझाईनचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.
बंगळुरूमधील अकासा एअरने त्यांच्या विमानाच्या डिझाईनचे अनावरण केले. "अकासा एअरचे ‘द रायझिंग ए’ अनावरण करत आहे. अवकाशापासून प्रेरित, द रायझिंग ए म्हणजे सूर्याची उबदारता, पक्ष्याप्रमाणे सहज उड्डाण आणि विमानाच्या पंखांच्या विश्वासार्हतेचे प्रतीक आहे,"असे अकासाने म्हटले आहे.
राकेश झुनझुनवालांच्या 'अकासा एअर'ला हवाई वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्रक मिळाले आहे. ही नवीन एअरलाईन्स 2022 पर्यंत सुरू करण्याचे लक्ष असल्याचे झुनझुनवालांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अकासा एअरमध्ये राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांची भागिदारी आहे.