नवी दिल्ली - एक नवीन ई-प्लॅटफॉर्म 'ट्रेड कनेक्ट' सुरू करण्याची तयारी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सुरू केली आहे. याद्वारे निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय व्यापार भागीदारांशी सामंजस्य प्रस्थापित करण्यात मदत मिळू शकणार आहे. नव्या सरकारने पहिल्या १०० दिवसांसाठी निश्चित केलेल्या प्राधान्य यादीत या ई प्लॅटफॉर्मचा समावेश आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
सूत्रांनी सांगितले की, सरकारने भारताची निर्यात २०३० पर्यंत २ लाख कोटी डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. उद्दिष्ट गाठण्यासाठी नवा ऑनलाइन प्लॅटफॉर्म बनविण्याची योजना आखली आहे. याशिवाय भारत सरकार अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार करीत आहे. निर्यात संघटनांची शिखर संस्था 'फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन'चे महासंचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सहाय यांनी सांगितले की, या प्लॅटफॉर्ममुळे मुख्यतः एमएसएमई उद्योगांना लाभ होईल. त्यांना निर्यातविषयक सर्व माहिती या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.
कशी होणार मदत?
- निर्यातदारांसमोरील आव्हानांवर तोडगा काढण्याचे काम करणार
- विभिन्न बाजार, क्षेत्रे आणि निर्यातीचे कल याची माहिती देणार
- निर्यातदारांचे काही प्रश्न असल्यास सरकारी अधिकारी उत्तरे देणार
- एमएसएमई उद्योगांना सर्व माहिती दिली जाणार