Join us  

कमाईचा नवीन सोपा मार्ग ‘आयपीओ’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 8:51 AM

यंदाचे वर्ष तर आयपीओ मार्केटसाठी भरभराटीचे ठरले आहे.

अजय वाळिंबे शेअर बाजारतज्ज्ञ

शेअर बाजारात प्रवेश करणाऱ्या नवख्या गुंतवणूकदारांसाठी ‘आयपीओ’ ही पहिली पायरी समजली जाते; मात्र गेल्या काही वर्षांत ‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. यंदाचे वर्ष तर आयपीओ मार्केटसाठी भरभराटीचे ठरले आहे. या वर्षाच्या पहिल्या साडेआठ महिन्यांतच ५७ आयपीओ यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, कंपन्यांनी ६२,००० कोटी रुपये उभे केले आहेत, यामध्ये अर्थात नुकत्याच संपलेल्या बजाज हाऊसिंगचा तसेच एसएमई आयपीओचा समावेश नाही. बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ नुकताच सूचीबद्ध झाला. बजाज हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स आयपीओ किमतीच्या ११४ टक्के प्रीमियमवर लिस्ट झाले. कंपनीच्या ६५६० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सुमारे ४.३० लाख कोटी रुपये जमा होऊन तो ६७ पट भरला.

एसएमई आयपीओमध्ये ग्रे-मार्केट प्रीमियम पाहून आयपीओला अप्लाय करायचा आणि चुकून शेअर्स लागलेच तर किमान एक लाख पदरात टाकून मोकळं व्हायचं असा साधा सरळ हिशेब आहे. रिटेल आणि एचएनआय गुंतवणूकदारांना म्हणूनच एसएमई आयपीओची भुरळ पडत आहे. एसएमई आयपीओंना मिळणारा प्रतिसाद इतका प्रचंड आहे की, तुम्हाला शेअर लागणे म्हणजे लॉटरी लागली असा प्रकार आहे. एसएमई आयपीओची इश्यू साइज लहान असल्याने त्यांचा भरणा देखील पाचशे/ हजार पटीत होतो. साहजिकच त्यामुळे अलॉटमेंट कठीण आहे. किमान भरणा रक्कम सरासरी १.२५ लाख असूनही प्रतिसाद प्रचंड आहे. याला सट्ट्याचे स्वरूप आल्याने सेबी एसएमई आयपीओवर नजर ठेवून आहे. 

प्राइम डेटाबेसमधील डेटाप्रमाणे सेबी-नोंदणीकृत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय) आणि पर्यायी गुंतवणूक निधी (एआयएफ) देखील मॉर्गन स्टॅनले एशिया (सिंगापूर), इंडिया मॅक्स इन्व्हेस्टमेंट फंड, सोसायटी जनरल ओडीआय, इलारा इंडिया अपॉर्च्युनिटीज सारखे अनेक फंड, नियमितपणे अँकर गुंतवणूकदारांच्या यादीमध्ये सहभागी होत असून “संस्थात्मक गुंतवणूकदार देखील आता एसएमई आयपीओमध्ये सहभागी होत आहेत; यामुळे या विभागाला अधिक विश्वासार्हता मिळाली आहे. 

गेल्या दशकात एसएमई विभागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरीही, सरकारी आकडेवारीनुसार देशात सहा कोटींहून अधिक नोंदणीकृत एसएमई आहेत. म्हणजेच अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

प्रत्येक गुंतवणुकीत जोखीम असतेच आणि आयपीओ त्याला अपवाद नाहीत. कोणत्याही आयपीओ किंवा ऑफर फॉर सेल (ओएफएस)मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीचे उद्योग क्षेत्र जाणून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे, प्रवर्तकांची माहिती मिळवणे, अधिमूल्य तपासणे आणि आयपीओचे रेटिंग पाहणे आवश्यक आहे.

५७ आयपीओंपैकी पांच आयपीओंनी दुपटीपेक्षा जास्त परतावा दिला आहे.

१५ आयपीओंनी ५० ते ९०% दरम्यान परतावा दिला आहे. 

चालू वर्षांत १७२ एसएमई आयपीओ सूचिबद्ध झाले असून त्यापैकी २९ आयपीओंनी पाहिल्याच दिवशी दुपटीहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.

नवीन नियमांनुसार आता एसएमई आयपीओचे लिस्टिंग ९०% अधिमूल्यापेक्षा जास्त होऊ शकणार नाही.

सर्वांत जास्त फायदा ‘विभोर स्टील’ या कंपनीच्या आयपीओने दिला होता. या कंपनीचे १५१ रुपयांना दिलेले शेअर्स ४४२ रुपयांना लिस्ट झाले होते.

मेन लाइन आयपीओपेक्षा सध्या एसएमई आयपीओची प्राथमिक बाजारातील कामगिरी आणि मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता, एसएमई शेअर्सची अलॉटमेंट म्हणजे लॉटरी असा सरळ हिशेब आहे. 

टॅग्स :व्यवसायइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार