- उमेश शर्मा (चार्टर्ड अकाउंटंट)अर्जुन : कृष्णा, नवीन आर्थिक वर्ष २४-२५ सुरू होत आहे. यामध्ये करदात्याने एप्रिलफुल न बनता म्हणजेच, चुका न करता कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?कृष्ण : अर्जुन, नवीन आर्थिक वर्ष कायद्यामध्ये नवीन बदल घेऊन येत असते आणि व्यावसायिकांसाठी आपल्या मागील चुका दुरुस्त करण्यासाठी संधीही सोबत आणत असते. नवीन आर्थिक वर्षात करदात्यांनी या पुढील गोष्टी कराव्यात :-१. आपली वार्षिक उलाढाल जर लघु आणि सूक्ष्म उद्योजकांच्या नियमात बसत असेल तर उद्यम रजिस्ट्रेशन करून घेणे आणि त्याबद्दल आपल्या खरेदीदारांना माहिती देणे.२. आपल्या सर्व पुरवठादारांकडून जर ते सूक्ष्म आणि लघुउद्योजक असतील तर त्यांच्याकडून त्यांचे उद्यम नंबर घ्यावेत आणि अशा उद्योजकांना १५ ते ४५ दिवसांच्या आत पेमेंट करावे.३. जर मागील आर्थिक वर्षात उलाढाल १० कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर १ एप्रिलनंतर ५० लाखांच्या वरील खरेदी-विक्रीवर १९४ Q अंतर्गत टीडीएस आणि २०६ C(१H) अंतर्गत टीसीएस लागू करावा.४. सर्व पुरवठादारांचे पॅन आधारशी लिंक आहे की नाही याची दखल घ्यावी. नसल्यास १ एप्रिलनंतर २० टक्क्यांनी टीडीएस करावा.५. मागील वर्षाची उलाढाल बघून जर १ ते १० कोटींच्या वर उलाढाल असेल तर टॅक्स ऑडिटसंबंधित माहिती तयार करून ठेवा आणि उलाढाल ३ कोटींपर्यंत असेल तर प्रिझम्टिव्ह स्कीममध्ये जायचं की नाही, याचा निर्णय घ्यावा.६. जर मागील आर्थिक वर्षात उलाढाल ५ कोटींपेक्षा जास्त असेल तर १ एप्रिलपासून ई-इन्व्हॉयसिंग करावी.७. नवीन आर्थिक वर्षासाठी नवीन बिलिंग सिरीज सुरू करावी.८. ज्या व्यापाऱ्यांना जुनी करप्रणाली निवडायची असेल त्यांनी रिटर्न दाखल करण्याच्या अंतिम तारखेअगोदर फॉर्म १० आयईए दाखल करावा.अर्जुन : कृष्णा, यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुन, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच करदात्यांनी योग्य तयारी करायला हवी आणि मागील चुका टाळायला हव्यात, म्हणजे एप्रिलफुल होणार नाही.
‘एप्रिलफुल’ बनायचे नसल्यास..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 9:07 AM