- प्रसाद गो. जोशीआंतरराष्ट्रीय बाजारात मंदी असतानाही देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकार अधिकारावर येण्याच्या वार्तेने बाजारात आनंदाचे उधाण आले. यामुळे गुरुवारी बाजारात अभूतपूर्व तेजी आली आणि सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चांकावर भरारी घेतली. यानंतर बाजारामध्ये नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे ४० आणि १२ हजारांची पातळी राखू शकले नाहीत.मुंबई शेअर बाजार गतसप्ताहात संमिश्र राहिला असला तरी बाजारातील तेजीचा वेग प्रचंड होता. सप्ताहाचा प्रारंभ तेजीने करणाऱ्या बाजाराने नंतर ४०,१२४.९६ अंश अशी उच्चांकी भरारीही घेतली. त्यानंतर मात्र नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीने सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक ३९,४३४.७२ अंशांवर बंद झाला. सप्ताहामध्ये त्यामध्ये १,५०३.९५ अंश म्हणजे चार टक्क्यांनी वाढ झाली.राष्टÑीय शेअर बाजारातही गुरुवारी प्रचंड तेजी होती. यामध्ये येथील निर्देशांकाने प्रथमच १२ हजार अंशांची पातळी ओलांडली. मात्र, सप्ताहाच्या अखेरीस विक्रीच्या दबावाने हा निर्देशांक ४३६.९५ अंश (चार टक्के) वाढून ११,८४४.१० अंशावर बंद झाला.मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकामध्येही चांगलीच वाढ झालेली बघावयास मिळाली. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप निर्देशांक ६३६.८८ अंश म्हणजेच ४.८८ टक्क्यांनी वाढून १४,९४५.२४ अंशावर बंद झाला. स्मॉलकॅपमध्ये तर ६.७ टक्के वाढ झाली. तो ८६९.९२ अंशांनी वर जाऊन १४,६९९.५६ अंशावर बंद झाला. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भक्कम बहुमताने निवडून आल्याने बाजाराला आनंदाचे भरते आले. आता आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम वेग घेण्याची अपेक्षा बाजाराला आहे. त्याचप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ७ टक्क्यांहून अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केलेली असल्याने त्याचा फायदाही बाजाराला होणार आहे. यामुळेच बाजाराने आंतरराष्टÑीय चिंता सोडून जल्लोष केला गेला.
मोदी त्सुनामीच्या जोरावर निर्देशांकांचे नवीन उच्चांक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 5:24 AM