भारतीय रिझर्व्ह बॅँकेने कायम राखलेल्या व्याजदरांमुळे बाजारात आलेली निराशा आणि अमेरिकन अध्यक्षांनी सूतोवाच केलेल्या करसुधारणांबाबत असलेली साशंकता या पार्श्वभूमीवर परकीय वित्तसंस्थांनी केलेल्या खरेदीमुळे निर्देशांक वाढते राहिले. मिडकॅप निर्देशांकाने नवीन उच्चांकाची केलेली नोंद ही महत्त्वपूर्ण घटना ठरली. अमेरिकेतील व्याजदर आणि विविध आस्थापनांचे निकाल यावर आता बाजाराची दिशा ठरेल.बाजारामध्ये सप्ताहाचा प्रारंभ तेजीने झाला असला तरी भारतीय रिझर्व्ह बॅँकेने पतधोरणामध्ये व्याजदर कायम राखल्याचा बाजारावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे त्या दिवशी बाजार खाली आला. मात्र नंतर त्यात सुधारणा झाली. सप्ताहाच्या अखेरीस संवेदनशील निर्देशांक ९३.७३ अंशांनी वाढून २८३३४.२५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ५२ अंशांनी वाढून ८७९३ अंशांवर बंद झाला. मिडकॅप या क्षेत्रीय निर्देशांकाने १६२२७ अंशांची आतापर्यंतची सर्वांत उच्चांकी झेप घेतली. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही वाढ झाली.भारतीय रिझर्व्ह बॅँकेकडून व्याजदरातील कपातीची आशा फोल ठरल्याने बाजारात निराशा आली. परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहामध्ये खरेदीचे धोरण स्वीकारले. या संस्थांनी सप्ताहामध्ये सुमारे ७४४ कोटी रुपयांची खरेदी केली. यामुळे बाजारामध्ये वाढ दिसून आली. अमेरिकेतील व्याजदर वाढीमधील साशंकता, अमेरिकन अध्यक्षांनी सूतोवाच केलेल्या करसुधारणा आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमती यामुळेही वाट बघण्याची भूमिका खरेदीदारांनी घेतली. जगभरातील घडामोडींचा भारतीय चलनाचे मूल्य तसेच चलनवाढीवर परिणाम होणार असल्याने बाजाराने सावध भूमिका घेतली. बाजारामध्ये आता करेक्शन येण्याची अपेक्षा असून, रिझर्व्ह बॅँकेने व्याजदर कायम ठेवल्यानंतर त्याचा प्रारंभ झाल्याचे जाणकारांचे मत आहे. आगामी सप्ताहात येणाऱ्या आस्थापनांच्या तिमाही निकालांवर बाजाराची दिशा ठरेल, असे दिसते.
मिडकॅप निर्देशांकाचा नवीन उच्चांक
By admin | Published: February 13, 2017 12:17 AM