Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाढीच्या तिसऱ्या सप्ताहात निर्देशांकांचे नवीन उच्चांक

वाढीच्या तिसऱ्या सप्ताहात निर्देशांकांचे नवीन उच्चांक

शेअर बाजारातील तेजी सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये कायम असून, संवेदनशील आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उच्चांक प्रस्थापित केले आहेत.

By admin | Published: May 29, 2017 12:54 AM2017-05-29T00:54:13+5:302017-05-29T01:00:26+5:30

शेअर बाजारातील तेजी सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये कायम असून, संवेदनशील आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उच्चांक प्रस्थापित केले आहेत.

New index of index in the third week of growth | वाढीच्या तिसऱ्या सप्ताहात निर्देशांकांचे नवीन उच्चांक

वाढीच्या तिसऱ्या सप्ताहात निर्देशांकांचे नवीन उच्चांक

- प्रसाद गो. जोशी - 

शेअर बाजारातील तेजी सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये कायम असून, संवेदनशील आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उच्चांक प्रस्थापित केले आहेत. जागतिक शेअर बाजारांमध्ये काहीसे मंदीचे वातावरण असताना भारतामध्ये मात्र, दिवाळी साजरी होताना दिसत आहे. विविध आस्थापनांचे जाहीर झालेले चांगले निकाल, परकीय वित्तसंस्थांची सुरू असलेली सातत्यपूर्ण खरेदी आणि अमेरिकेने व्याजदर वाढीबाबत रोखून धरलेला निर्णय याचा बाजाराला फायदा मिळाला. सौदापूर्तीमध्येही बाजारात तेजी दिसून आली.
मुंबई शेअर बाजारामध्ये सप्ताहात तेजीचेच वारे वाहताना दिसून आले. संवेदनशील निर्देशांकाने ३१०७४.०७ असा नवीन सार्वकालीक उच्चांक प्रस्थापित केला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ३१०२८.२१ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ५६३.२९ अंश म्हणजे १.८५ टक्के वाढ झाली आहे. असे असले, तरी बाजारातील साप्ताहिक उलाढाल मात्र, कमी झाली आहे. या निर्देशांकातील ३० पैकी १९ आस्थापनांच्या दरांमध्ये वाढ झालेली दिसून आली.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानेही (निफ्टी) १६७.२० अंश म्हणजे १.७७ टक्क्यांची वाढ नोंदविली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ९५९५.१० अंशांवर उच्चांकी बंद झाला. तत्पूर्वी या निर्देशांकाने ९६०४.९० अशी नवीन उच्चांकी धडक मारली. राष्ट्रीय शेअर बाजारामधील साप्ताहिक उलाढाल गतसप्ताहापेक्षा सुमारे नऊ हजार कोटी रुपयांनी वाढली. गेले काही महिने सातत्याने वाढत असलेल्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्ये मात्र, या आठवड्यातही घट झाली आहे.
इंग्लंडमध्ये दहशतवाद्यांनी घडविलेले बॉम्बस्फोट, अमेरिकेने व्याजदरात वाढ करण्यासाठी आणखी वाट बघण्याचा घेतलेला निर्णय, ओपेकने घटविलेले खनिज तेलाचे उत्पादन अशा विविध कारणांमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंदी दिसून आले. यामुळे परकीय वित्तसंस्थांनी मात्र, भारतीय बाजारामधून अधिक वेगाने खरेदीला प्रारंभ केलेला दिसून येतो.

परकीय चलन गंगाजळीत  विक्रमी शिल्लक

भारताच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये मोठी वाढ होऊन ती विक्रमी उंचीवर पोहोचली आहे. १९ मे रोजी संपलेल्या सप्ताहात परकीय चलन गंगाजळीमध्ये ४.०३ अब्ज डॉलरची वाढ होऊन, ती ३७९.३१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. परकीय चलन गंगाजळीचा हा नवीन उच्चांक आहे.
या आधीच्या सप्ताहामध्ये परकीय चलन गंगाजळीमध्ये ४४.३६ कोटी डॉलरची घट होऊन, ती ३७५.२७ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली होती.
देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये अमेरिकेशिवायच्या युरो, पौंड, येन अशा इतर चलनांचाही समावेश असतो. मात्र, एकूण हिशोब करताना, या चलनांचे डॉलरमधील मूल्य काढून ते मोजले जात असते.
या कालावधीमध्ये देशातील सोन्याचा राखीव साठा २० हजार ४३८ अमेरिकन डॉलरवर स्थिर राहिला आहे.

Web Title: New index of index in the third week of growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.