Join us

नववर्षात नव्या नोकऱ्यांची संधी, 'एवढ्या' रोजगारांची होणार निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 5:05 PM

मोदी सरकारच्या गेल्या काही काळापासून नोकऱ्यांमध्ये वारंवार कपात होत असल्याचं अनेकदा निदर्शनास आलं.

मुंबई : मोदी सरकारच्या गेल्या काही काळापासून नोकऱ्यांमध्ये वारंवार कपात होत असल्याचं अनेकदा निदर्शनास आलं. परंतु नव्या वर्षात नव्या नोकऱ्या उत्पन्न होणार असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. नव्या वर्षात खासगी क्षेत्रात जवळपास 7 लाख नवीन रोजगारांची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती एका सर्व्हेतून उघड झाली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना सरासरी 8 ते 10 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ मिळणार असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अर्थव्यवस्था सुधारत असल्याच्या पार्श्वभूमीवर MyHiringClub.com आणि Sarkari-Naukri.info या दोन संस्थांनी केलेल्या सर्व्हेत खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी नोकर भरती करण्याचे सूतोवाच केले आहेत. या सर्वेक्षणात जवळपास 42 शहरांमधील 4278 कंपन्यांच्या नोकर भरतीसंदर्भातील अंदाजाची चाचपणी केली आहे. यंदा वेतनवाढ आणि बोनसमध्ये सरासरी वाढ होण्याचा अंदाज या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. कंपन्यांकडून 10 टक्के बोनस मिळणार असल्याचंही या सर्व्हेत म्हटलं आहे. स्टार्टअप कंपन्या मोठ्या प्रमाणात भरती करतील, असे MyHiringClub.com आणि Sarkari-Naukri.infoचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले आहे.काही शहरांमध्ये रोजगार निर्मितीची मोठी क्षमता असून, या शहरांमधील खर्च मोठ्या शहरांच्या तुलनेत कमी असल्याने कंपन्या इथे उद्योग सुरू करण्यास पुढाकार घेण्याची शक्यता आहे. 2019मध्ये याच सर्वेक्षणात 6 लाख 20 हजार रोजगार उपलब्ध होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यातील 5 लाख 90 हजार रोजगार उत्पन्नसुद्धा झाले होते. 2020 या वर्षात 12 वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रात सात लाखांहून अधिक नोकरीच्या संधी निर्माण होणार असल्याचाही अंदाज आता या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. रिटेल आणि ई-कॉमर्स क्षेत्रात 1,12000 रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता असून, आयटी आणि आयटीज क्षेत्रात 105500 नोकऱ्या उपलब्ध होण्याची अटकळ बांधली जात आहे. तर एफएमसीजी क्षेत्रात 87500, उत्पादन क्षेत्रात 6,8900, बीएफएसआय क्षेत्रात 59700, हेल्थकेअर क्षेत्रात 98300 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. तसेच मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि एनसीआर, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये 5 लाख 14 हजार 900 नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाजही या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :नोकरी