नवीन कामगार कायद्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. कर्मचारी या कायद्याची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आता या कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. मात्र, यासंदर्भात अद्याप कुठलीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, सरकार एक ऑक्टोबरपासून हा कायदा लागू करू शकते. तत्पूर्वी, हा कायदा एक जुलैपासून लागू करण्याची चर्चा सुरू होती. तर जाणून घेऊयात, या नव्या कामगाय कायद्याचे फायदे...
आठवड्याला तीन दिवसांची सुट्टी! -
नव्या लेबर कोडनुसार कर्मचाऱ्यांना आठवड्यातील 48 तास काम करावे लागणार आहे. अर्थात कर्मचाऱ्यांना त्यांच्या ऑफीसमध्ये सलग चार दिवस 12-12 तास काम करावे लागेल. या 12 तासांदरम्यान त्यांना दिवसातून दोन वेळा अर्धा-अर्धा तास सुट्टी मिळेल. मात्र फायद्याची गोष्ट म्हणजे, हे चार दिवस 12-12 तास काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवसांची मोठी सुट्टीही मिळणार आहे. तत्पूर्वी, बऱ्याच दिवसांपासून, कामामुळे कुटुंबीयांना वेळ देता येत नाही, अशी तक्रारही कर्मचाऱ्यांकडून समोर येत होती.
पीएफ वाढणार -
नवीन लेबर कोडमध्ये खाजगी क्षेत्रात नोकऱ्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पैशांची कमतरता भासू नये, यासाठी पीएफमधील योगदान वाढविले जाणार आहे. यानुसार, मूळ वेतनाच्या 50% अथवा त्याहून अधिक योगदान पीएफमध्ये केले जाईल. याचा आणखी एक अर्थ असा, की आपली इन हॅन्ड सॅलरी कमी होईल. मात्र, काळजी करण्याचे कारण नाही, आपले पैसे पीएफ खात्यात राहतील. याशिवाय, ग्रॅच्युइटीही पूर्वीच्या तुलनेत वाढणार आहे.