सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, कार खरेदी व विक्री यावर जीएसटी आकारला जातो का ? तसेच कारच्या व्यवहाराशी निगडित जीएसटीचे नियम कोणते?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, खूप चांगला प्रश्न विचारलास. जीएसटी कायदा लागू झाल्यापासून या विषयावर अनेक नोटिफिकेशन्ससुद्धा काढले व त्याच्या तरतुदीमध्ये बदल केले. आपण कोणती प्रवासी वाहतुकीचे वाहन उदा.दुचाकी, बस, कार इत्यादी खरेदी करतो किंवा विकतो, तसेच यावर लागलेल्या जीएसटीचा सेटआॅफ यावर सविस्तर चर्चा करू या.
अर्जुन : कृष्णा, नवीन कार विकत घेतल्यास, त्यावर जीएसटी कसा लागतो?
कृष्ण : अर्जुना, कार विकत घेताना, त्यावर २८ टक्के जीएसटी लागतो, तसेच कारची लांबीच ती किती सीसीची आहे, यावरून त्याच्यावर सेस लागतो. सेसचा दर १५ टक्केपासून २२ टक्केपर्यंत आहे.
अर्जुन : कृष्णा, विकत घेतलेल्या कारवर लागलेल्या जीएसटीचा सेटआॅफ मिळतो का?
कृष्ण : अर्जुना, मोटारगाड्या दोन प्रकारच्या असतात. एक वस्तूच्या दळणवळणाची तर दुसरी प्रवाशांच्या दळणवळणाची. वस्तूंच्या दळणवळणासाठी घेतलेल्या गाडीचा सेटआॅफ मिळतो, परंतु प्रवाशांच्या दळणवळणासाठी घेतलेली गाडी जसे कार यावरचा सेटआॅफ सर्वांना मिळत नाही. ज्या व्यक्तींचा गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे, तसेच ज्या व्यक्तीच्या गाड्या भाड्याने द्यावयाचा व्यवसाय आहे, त्यांना गाड्या खरेदी करताना लागलेल्या जीएसटीचा क्रेडिट मिळतो, तसेच कार रिपेअरिंगवर आकारलेल्या जीएसटीचा सेटआॅफ मिळण्याबाबत अनेक वादविवाद आहे.
अर्जुन : कृष्णा, जर एखाद्या व्यक्तीने त्याची जुनी कार विकली, तर त्यावर जीएसटी लागेल का?
कृष्ण : अर्जुना, शासनाने २५ जानेवारी २०१८ रोजी या संदर्भात एक नोटिफिकेशन काढले, त्यानुसार मार्जिन (फरक)वर जीएसटी लागतो. जर कार व्यवसायात वापरली असेल व त्यावर घसारा घेतला, तर गाडीचे आयकर कायद्यानुसार घसारा वजा करून आलेल्या मूल्यापेक्षा जास्त रकमेनी गाडी विकली असेल, तर त्या फरकावरती जीएसटी लागेल, तसेच जीएसटीचा दर गाडीच्या प्रकारानुसार सीजीएसटी व एसजीएसटी मिळून १२ टक्के किंवा १८ टक्के आहे. जुन्या गाडीच्या विक्रीवर सेस लागणार नाही.
१) जर एका व्यक्तीने आय २० ही कार त्याच्या व्यवसायासाठी वर्ष २०१६-१७ मध्ये ८ लाख रुपयाला घेतली. दोन वर्षांचा घसारा जाऊन त्याचे मूल्य ५.५० लाख रुपए होत असेल व त्याने ही कार ६.५० लाख रुपयाला विकली, तर त्याला मार्र्जिन म्हणजे (फरक) वर १ लाख (६.५० वजा ५.५०) रुपयावरती जीएसटी भरावा लागेल.
२) जर एका व्यक्तीने आय २० ही कार वर्ष २०१६-१७ मध्ये ८ लाख रुपयाला घेतली. दोन वर्षांचा घसारा जाऊन त्याचे मूल्य ५.५० लाख रुपए होत असेल व त्याने ही कार ५ लाख रुपयाला विकली, तर त्याला जीएसटी भरावा लागणार नाही. कारण फरक निगेटिव्ह आहे.
३) जर एखाद्या पगारदार व्यक्तीने त्याची जुनी कार खरेदीपेक्षा जास्त रकमेने विकली, तरच त्याला फरकावरती जीएसटी भरावा लागेल. उदा. जर पगारदार व्यक्तीने ८ लाख रुपयाला विकत घेतलेली कार ७ लाखांना विकली, तर त्याला जीएसटी भरावा लागणार नाही. कारण फरक निगेटिव्ह आहे व तीच कार ८.५० हजाराला विकली, तर ५० हजारावर जीएसटी भरावा लागेल.
४) जुन्या कारचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याला मार्जिनवर जीएसटी भरावा लागेल. उदा. २ लाखांना मारोती अल्टो कार खरेदी केली व ती २.२५ हजाराला विकली, तर २५ हजारावर जीएसटी भरावा लागेल.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, प्रवासी वाहन विकत घेताना अनेकाना जीएसटीचे क्रेडिट मिळत नाही, परंतु कार विकताना मार्र्जिनवर जीएसटी भरण्याची संकल्पना आणली आहे. कारचा प्रकार पाहूनच जीएसटी आकारण्याचा निर्णय घ्यावा.
नवीन असो वा जुनी कार, जीएसटीच्या समस्या अपार
कृष्णा, कार खरेदी व विक्री यावर जीएसटी आकारला जातो का ? तसेच कारच्या व्यवहाराशी निगडित जीएसटीचे नियम कोणते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 02:39 AM2018-05-14T02:39:33+5:302018-05-14T02:39:33+5:30