शीलेश शर्मा
नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या सारंग केमिकल्स या कंपनीला शेअर घोटाळाप्रकरणी सेबीने कोट्यवधींचा दंड ठोठावल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी खुलासा करावा, असा आग्रहही काँग्रेसने धरला आहे. मात्र लवादाने या आदेशाला स्थगिती दिल्यानंतर सेबीने नवीन आदेश काढण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसने ही मागणी केल्यानंतर उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही ‘न खाऊंगा, न खाने दूंगा की कहानी, शाह-जादा शौर्य और अब विजय रूपानी’ अशी खरमरीत टीका करणारे ट्विट केले आहे. काँग्रेसचे नेते अखिलेश प्रताप सिंह म्हणाले की, मोदी यांना इतर सर्वांचा भ्रष्टाचार दिसतो; पण भाजपा नेत्यांचा भ्रष्टाचार मात्र त्यांना शिष्टाचार वाटतो. रूपाणी यांच्यावर भ्रष्टाचाराचा डाग असल्याने त्यांनी राजीनामा न दिल्यास मोदी यांनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करून ते म्हणाले की, भ्रष्ट मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा गुजरातमध्ये निवडणुका लढणार का, याचाही खुलासा व्हायला हवा.
रूपाणी यांच्या घोटाळ्याचे प्रकरण जानेवारी ते जून २0११ या काळातील आहे. विजय रूपानी यांनी शेअर्सची घरातच खरेदी करून, प्रत्यक्षात शेअरचे मूल्य वाढल्याचे दाखवले, असा आरोप आहे. हे उघड झाल्यावर सेबीने त्याची चौकशी सुरू केली आणि सर्व पुरावे मिळाल्यानंतर कारणे दाखवा नोटीस जारी केली. त्यासाठी रूपाणी यांना फोन केले, ईमेल पाठवले. पण रूपाणी यांनी त्यास उत्तर दिले नाही.
परिणामी, सेबीने विजय रूपाणी यांच्या कंपनीला १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
काँग्रेसने हा निवडणुकीचा मुद्दा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. रूपाणी यांचे नाव घेत, भ्रष्टाचाराला मोदीच संरक्षण देत आहेत, असे आरोप करणे काँग्रेसला या प्रकारामुळे शक्य होणार आहे.
रूपाणींच्या कंपनीचा दंड स्थगित, सेबी काढणार नवीन आदेश
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या सारंग केमिकल्स या कंपनीला शेअर घोटाळाप्रकरणी सेबीने कोट्यवधींचा दंड ठोठावल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 03:22 AM2017-11-10T03:22:25+5:302017-11-10T03:22:45+5:30