नवी दिल्ली : भाजीपाला, डाळी आणि साखरेचे भाव वाढल्यामुळे जुलैमध्ये ठोक क्षेत्रातील महागाईचा दर ३.५५ टक्के झाला. हा २३ महिन्यांचा उच्चांक ठरला आहे.ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर जूनमध्ये १.६२ टक्के, तर जुलै २0१५ मध्ये उणे (-) ४.00 टक्के होता. आॅगस्ट २0१४ नंतरची सर्वाेच्च पातळी त्याने आता गाठली आहे. आॅगस्ट २0१४ मध्ये तो ३.७४ टक्के होता. ठोक क्षेत्रातील महागाईच्या वाढीचे प्रमुख कारण खाद्य वस्तूंच्या वाढलेल्या किमती हे आहे. जुलैमध्ये भाजीपाल्याचे भाव २८.0५ टक्के वाढले आहेत. डाळी ३५.७६ टक्क्यांनी, तर बटाटे ५८.७८ टक्क्यांनी महाग झाले. साखर ३२.३३ टक्क्यांनी, तर फळे १७.३0 टक्क्यांनी महागले. खाद्य क्षेत्रातील एकूण महागाई दोन अंकी होऊन ११.८२ टक्क्यांनी वाढली आहे. ठोक किंमत निर्देशांक समाविष्ट असलेल्या वस्तूपैकी केवळ कांदे स्वस्त झाले आहेत. उरलेल्या सर्व वस्तू महागल्या आहेत. नोव्हेंबर २0१३ ते मार्च २0१६ या काळात ठोक क्षेत्रातील महागाईचा दर शून्याच्या खाली होता. त्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून तो वाढत आहे. कांदे आणि पेट्रोलचे भाव मात्र घटत आहेत. जुलैमध्ये कांद्याचा महागाई दर उणे (-) ३६.२९, तर पेट्रोल उणे (-) १0.३0 टक्क्यांवर होता. कारखाना उत्पादन क्षेत्रातील महगाईचा दर १.८३ टक्क्यांवर होता. साखरेच्या भावातील वाढीमुळे ही वाढ दिसत आहे. दरम्यान, मे महिन्यातील महागाईचा दर सुधारून १.२४ टक्के करण्यात आला आहे. आधी तो 0.७८ असा प्रस्तावित होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
महागाईने गाठले नवे टोक
By admin | Published: August 17, 2016 4:25 AM