Join us  

मोबाईल टॉवर लावण्यासाठी नवीन धोरण

By admin | Published: July 01, 2016 4:39 AM

आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा सरकारने इन्कार केला असून, याबाबत एक नवीन धोरण निश्चित केले जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

डेहरादून : मोबाईल टॉवरमुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा सरकारने इन्कार केला असून, याबाबत एक नवीन धोरण निश्चित केले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. या नवीन धोरणामुळे नवीन टॉवर विशेषत: निवासी भागांत लावणे सोपे होणार आहे.केंद्रीय दूरसंचार सचिव जे.एस. दीपक यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले की, याबाबत संबंधित पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. पुढील दोन महिन्यांत हे धोरण तयार होईल, अशी मला आशा आहे.मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या किरणांमुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे अद्यापपर्यंत कोणत्याही अभ्यासातून स्पष्ट झालेले नाही. जागतिक आरोग्य संघटना किंवा अन्य कोणत्याही संस्थेच्या अभ्यासात ही बाब आढळून आलेली नसल्याचे दीपक यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.कॉल ड्रॉपचा उल्लेख करून दीपक म्हणाले की, मोबाईल टॉवरची संख्या कमी असल्याने असे होऊ शकते. सध्या देशात केवळ पाच लाख मोबाईल टॉवर आहेत. कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाटी किती टॉवरची गरज आहे, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. नवी दिल्लीतील अकबर रोडचा हवाला देऊन ते म्हणाले की, या भागात पूर्वी कनेक्टिव्हिटी ठीक झाली आहे. त्यामुळे कॉल ड्रॉपच्या घटना कमी झाल्या आहेत. बीएसएनएलसुद्धा आपली स्वतंत्र मोबाईल टॉवर कंपनी बनवीत आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटीची समस्या कमी होईल. (वृत्तसंस्था)>मोबाईल टॉवरमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा दुष्प्रचार केला जात आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी देशभर कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. त्याद्वारे लोकांना योग्य ती माहिती दिली जाईल. त्या दृष्टीने डेहरादून येथे गुरुवारी पहिली कार्यशाळा झाली.