नवी दिल्ली : ऑनलाइन प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने नवीन पोर्टल सुरू केले आहे. नवे पोर्टल वापरस्नेही असून, विवरणपत्रे भरणे त्यामुळे सहज सोपे होणार आहे. नवे पोर्टल सुरू होताच जुने पोर्टल आता बंद करण्यात आले आहे.केंद्रीय थेट कर बोर्डाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, नव्या वेबसाइटचा पत्ता www.incometax.gov.in असा असून, जुन्या वेबसाइटवरून नव्या वेबसाइटवर जाण्याची प्रक्रिया ७ जून रोजी पूर्ण झाली. या स्थलांतरामुळे १ जून ते ६ जून या काळात जुनी वेबसाइट करदात्यांना तसेच इतर सर्व हितधारकांना उपलब्ध नव्हती. या काळातील सर्व अनुपालन तारखांचे आता पुनर्नियोजन केले जाईल. करदात्यांची प्रलंबित कामे अडकून पडू नयेत यासाठी हा निर्णय प्राप्तिकर विभागाने घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अशी आहेत नव्या पोर्टलची वैशिष्ट्ये- नव्या वेबसाइटचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये असे आहे की, यात डेस्कटॉपवरील सर्व सुविधा मोबाइल ॲपवरही उपलब्ध असतील. त्यामुळे मोबाइलद्वारे आयटीआर दाखल करणे सुलभ होईल.- ही वेबसाइट आयटीआर प्रोसेसिंगशी जोडण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रोसेसिंगची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल. परिणामी करदात्यांना तातडीने परतावे (रिफंड) मिळण्यास मदत होईल. - नव्या पोर्टलवर सर्व प्रकारचा संवाद, अपलोड अथवा प्रलंबित क्रिया एकाच डॅशबोर्डवर दर्शविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ते वापरण्यास सुलभ आहे. प्राप्तिकराशी संबंधित सर्व कामे आता एकाच ठिकाणाहून करता येतील. - आयटीआर तयारीसाठी मोफत सॉफ्टवेअर नव्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सॉफ्टवेअरचा वापर ऑनलाइन आणि ऑफलाइन असा दोन्ही प्रकारे करता येईल.