मुंबई : नव्या कोरोना संकटाला रोखण्यानिमित्त सरकारने नियमावलीमध्ये लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना पाचशे रुपये दंड व दुकानांमध्ये असा ग्राहक आढळल्यास दहा हजार रुपये दंडाची केलेली तरतूद अराजकतेला आमंत्रण देणारी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. व्यापारी आस्थापनांमध्ये लसीकरण पूर्ण केलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देतील. प्रबोधनही करतील; परंतु एखाद्या ग्राहकाच्या चुकीची शिक्षा दुकानदाराला देणे तर्कसंगत नाही. त्यामुळे दंडाची तरतूद संबंधीतांना लागू करावी. व्यापारी आस्थापनांना दंड आकारणीची तरतूद रद्द करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना केल्याचे ललित गांधी व वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी सांगितले.
आता व्यापार सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. अशावेळी तरतुदी करून, निर्बंध लादणे अर्थव्यवस्थेला खीळ बसवणारे आहे. सरकारने हा निर्णय रद्द करावा; अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशाराही ललित गांधी यांनी दिला आहे.