झुरिक : काळा पैसा लपवून ठेवण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणून निर्माण झालेला लौकिक पुसून टाकण्याचा प्रयत्न म्हणून स्वीत्झर्लंड सरकारने मनी लाण्ड्रिंगविरोधात नवे नियम लागू केले आहेत. बुधवारी या नियमांची घोषणा स्वीस सरकारच्या वतीने करण्यात आली.
इंटरगव्हर्नमेन्टल फायनान्शिअर टास्क फोर्सच्या वतीने गेल्यावर्षी या नियमांची शिफारस करण्यात आली होती. १ लाख स्वीस फ्रँकपेक्षा जास्त रकमेचे रोख पेमेंट स्वीकारताना काही नवे नियम स्थापन करण्याची शिफारस टास्क फोर्सने केली होती. त्याचीच आता अंमलबजावणी केली जात आहे.
स्वीस सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, धार्मिक संस्थांच्या नोंदणीसाठी स्वीत्झर्लंडमध्ये नवे नियम लागू होणार आहेत. पुढील वर्षांपासून हे नियम लागू होतील.
करचुकविणाऱ्या बड्या पैसेवाल्यांसाठी स्वीत्झर्लंड पैसे लपविण्याचा स्वर्ग ठरला आहे. गेल्या कित्येक दशकांपासून जगभरातील श्रीमंत लोक आपला काळा पैसा स्वीत्झर्लंडमध्ये दडवून ठेवत असत. अलीकडच्या काळात या बाबतीत मोठा गवगवा झाल्याने स्वीस सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. यंदा खाजगी स्वीस बँक एचएसबीसीची काही गोपनीय कागदपत्रे फुटली. त्यासोबत स्वीस बँकांचे काळ्या पैशाचे बिंगही फुटले. त्यावरून सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. जगभरातून येणाऱ्या दबावानंतर स्वीस बँकांच्या संघटनेने जून महिन्यात मनी लॉण्ड्रिंगविरोधी उपाय योजण्याची घोषणा केली होती. पुढील वर्षापासून बँकांच्या व्यवहारांत पारदर्शकता आणण्यासाठी काही नियम करण्यात येतील, असेही बँकांच्या संघटनेने म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर स्वीस सरकारने नव्या नियमांची घोषणा केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
मनी लॉण्ड्रिंग विरोधात स्वीसमध्ये नवे नियम
काळा पैसा लपवून ठेवण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणून निर्माण झालेला लौकिक पुसून टाकण्याचा प्रयत्न म्हणून स्वीत्झर्लंड सरकारने मनी लाण्ड्रिंगविरोधात नवे नियम लागू केले आहेत.
By admin | Published: November 11, 2015 11:19 PM2015-11-11T23:19:46+5:302015-11-11T23:19:46+5:30