नवी दिल्ली : नव्या वर्षांच्या स्वागतासाठी सारेच जण सज्ज झाले आहेत. अशात येणारे वर्ष प्रगती आणि भरपूर नोकऱ्या घेऊन येत आहे, याचे संकेत मिळत आहेत. सर्वांत मोठ्या शहरांमध्ये विविध मोठ्या कंपन्या आपली कार्यालये थाटत आहेत. त्यात हजारो लोकांना रोजगार मिळत आहेत. कंपन्यांकडून जोरदार मागणी वाढल्याने सहा प्रमुख शहरांमध्ये २०२३ मध्ये एकूण कार्यालयीन जागा १६ टक्क्यांनी वाढून ५.८२ कोटी चौरस फुटांवर गेली आहे. मागच्या वर्षी हेच प्रमाण ५.०३ कोटी वर्ग फूट इतके होते.
देशातील विविध कंपन्या आणि को-वर्किंग ऑपरेटर्स यांच्याकडून या काळात कार्यालयीन जागेसाठी जोरदार मागणी झाल्याचे कोलियर्स इंडियाच्या अहवालातून समोर आले आहे. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि स्थैर्य यामुळे अनेक विदेशी कंपन्या भारताकडे आकर्षित झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळातही ही मागणी कायम राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. (वृत्तसंस्था)
मागणीत ९२ टक्के वाढ
रियल इस्टेल कन्सल्टंट कोलियर्स इंडिया ही कंपनी देशातील मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर क्षेत्र आणि हैदराबाद या प्रमुख शहरांमधील कार्यालयीन जागेसाठी होणारी मागणी आणि त्यासाठी होणारी उपलब्धता यावर नजर ठेवते. या सहा शहरांमध्ये ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत कार्यालयीन जागेच्या मागणी ९२ टक्के वाढ झाल्याचे कंपनीच्या ताज्या अहवालातून दिसून आले आहे. विदेशातील कंपन्यांही शहरांमध्ये कार्यालये घेताना दिसत आहेत.