वेलिंग्टन: जगभरात आर्थिक मंदी हळूहळू पाय पसरू लागली आहे. जर्मनीसह युरोक्षेत्रातील २० देशांपाठोपाठ आता न्यूझीलंडची अर्थव्यवस्थाही मंदीच्या विळख्यात सापडली आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. मंदीमागे महागाई, व्याज दरवाढ तसेच नैसर्गिक आपत्ती कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
न्यूझीलंड सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, न्यूझीलंडच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) मार्चच्या तिमाहीत ०.१ टक्के घसरण झाली. त्याआधीच्या तिमाहीत जीडीपीमध्ये ०.७ टक्के घसरण झाली होती. सलग २ तिमाहीत जीडीपी घसरल्यामुळे न्यूझीलंडमध्ये मंदीचा शिरकाव झाल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी सांगितले की, न्यूझीलंडमधील मंदी अपेक्षेनुसारच आहे. या घसरगुंडीनंतर १ न्यूझीलंड डॉलरची किंमत ६२ अमेरिकी सेंट्स इतकी झाली आहे. (वृत्तसंस्था)
नैसर्गिक आपत्तीही कारणीभूत
न्यूझीलंडच्या सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे की, न्यूझीलंडचा वृद्धीदर घसरण्यामागे ऑकलँडमधील पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या सातत्याने आलेल्या नैसर्गिक आपत्तीही कारणीभूत आहेत.प्रतिकूल हवामान आणि पुरामुळे नॉर्थ आयलँडवर झालेल्या नुकसानीचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे.
व्याजदरातील वाढ कारणीभूत
सूत्रांनी सांगितले की, न्यूझीलंडच्या केंद्रीय बँकेने सतत व्याज दरवाढ केल्यामुळे मंदीचा शिरकाव देशात झाला आहे. केंद्रीय बँकेने सलग बाराव्या वेळी व्याजदर वाढवून ५.५ टक्के केला आहे. २००८ नंतरचा हा सर्वोच्च व्याजदर ठरला आहे. त्यामुळे घरे, कार आणि अन्य वस्तू महाग झाल्या आहेत. तसेच लोकांची खरेदीची क्षमताही घटली. त्यामुळे अर्थव्यवस्था मंदीत आली आहे. दरम्यान, आता आणखी व्याज दरवाढ केली जाणार नसल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ न्यूझीलंडने म्हटले आहे. पुढील पाऊल व्याज दरात कपात करण्याचे असेल, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
शेअर बाजाराची नवी झेप; झाला २९२ लाख कोटींचा, बीएसईमध्ये नाेंदणीकृत कंपन्यांचा विक्रम
शेअर बाजारात सध्या तेजी आहे. विदेशी आणि स्थानिक भांडवली प्रवाह गतिमान झाल्यामुळे गुरुवारी सकाळी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २९२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. बीएसई बाजार भांडवलाचा हा नवा विक्रम ठरला आहे. याआधीचा बीएसई सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाचा उच्चांक १४ डिसेंबर २०२२ रोजी झाला होता. त्या दिवशी शेअर बाजार बंद झाला तेव्हा बीएसईचे बाजार भांडवल २९१.२५ लाख कोटी रुपये होते. हा विक्रम गुरुवारी मोडला गेला आहे. बीएसईमध्ये पाच हजारपेक्षा अधिक कंपन्या सूचिबद्ध आहेत. यात म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ), आरईआयटी, इनव्हीआयटी, डिफरन्शिअल व्होटिंग राइट्स (डीव्हीआर) यांचे समभाग आणि बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवरील सूचिबद्ध कंपन्यांचा समावेश आहे.
३१० अंकांनी सेन्सेक्स गडगडला
- विक्रीचा मारा व अमेरिकेच्या मध्यवर्ती बॅंकेने आणखी व्याजदर वाढीचे संकेत दिल्यामुळे सेन्सेक्स ३१०.८८, तर निफ्टी ६७.८० अंकांनी गडगडले.
- आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात गुंतवले- ₹६६,७३० कोटी
- विदेशी भांडवलाचा ओघ- सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये गेल्या तीन महिन्यांत सुमारे १० टक्के तेजी नोंदवली आहे. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये १६ ते १७ टक्के तेजी पाहायला मिळाली. विदेशी भांडवलाचा वाढलेला ओघ हे तेजीचे एक प्रमुख कारण आहे.