अहमदाबाद – प्रसिद्ध उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत स्थान असलेले गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कुटुंबाबद्दल गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा सुरू आहेत. गौतम अदानी अथवा त्यांच्या पत्नी डॉ. प्रिती अदानी यांना राज्यसभा सदस्य बनवलं जाऊ शकतं असा दावा केला जात आहे. मात्र आता या चर्चेवर अदानी ग्रुपकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अदानी कुटुंबातील कुठल्याही सदस्यास राजकारणात रस नाही असं सांगण्यात आले आहे.
अदानी ग्रुपनं सांगितले की, मागील काही दिवसांपासून गौतम अदानी किंवा त्यांच्या पत्नी डॉ. प्रिती अदानी यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचं वृत्त प्रसारित होत आहे. परंतु हे वृत्त पूर्णत: चुकीचं आहे. अनेकजण स्वत:च्या फायद्यासाठी आमचं नाव मलीन करत आहेत. गौतम अदानी, डॉ. प्रिती अदानी यांच्यासह कुटुंबातील कुठलाही सदस्य राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. ही बातमी चुकीची आहे असं त्यांनी सांगितले आहे.
अदानी समुहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी २५ एप्रिलला जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या फोर्ब्सच्या यादीत ५ व्या स्थानावर झेप घेतली. अदानी यांची एकूण संपत्ती १२३.१ अब्ज डॉलर्स आहे. त्यांनी वॉरेन बफेट यांना मागे टाकत ५ वे स्थान पटकावले. बफेट यांच्याकडे एकूण १२१.७ अब्ज डॉलर्स संपत्ती आहे. अदानी यांच्यामुळे ते सहाव्या स्थानी आले. अवघ्या ५ लाख रुपयांनी गौतम अदानी यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केली होती. अदानी समुहाच्या या यशामागे मेहनत, बुद्धी कौशल्य, उत्तम संघटकसारखे गुण आहेत. कॉलेजचं शिक्षणही अर्धवट राहिलेल्या अदानी यांनी हिऱ्याच्या व्यवसायापासून त्यांची सुरुवात केली. ते १६ वर्षाचे असताना मुंबईत आले होते. १९८१ मध्ये ते गुजरातला परतले त्यानंतर भावाच्या कंपनीत नोकरी करू लागले.
व्यवसाय क्षेत्रात गौतम अदानी यांनी १९८८ मध्ये पाऊल ठेवलं. त्यांनी अदानी एक्सपोर्टस नावाची पहिली कंपनी स्थापन केली. अवघ्या ५ लाख रुपयांच्या भाग भांडवल घेऊन सुरू केलेली कंपनी अदानी एंटरप्राइजेज म्हणून नावारुपाला आली. १९९४ मध्ये अदानी लि. शेअर बाजारात उतरली. १९९१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी भारतात आर्थिक चालना आणली. त्यामुळे देशात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळालं. या बदलामुळे अनेक उद्योगपतींना फायदा झाला.