Crypto Income In ITR : नवीन आर्थिक वर्षातील इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फॉर्ममध्ये क्रिप्टोकरन्सीमधून मिळणारा (Cryptocurrency) नफा आणि कर भरण्यासाठी एक स्वतंत्र कॉलम असेल. महसूल सचिव तरुण बजाज यांनी ही माहिती दिली आहे. आयटीआर फॉर्ममध्ये करदात्यांना क्रिप्टोसाठी स्वतंत्र कॉलम दिसेल. या कॉलममध्ये क्रिप्टो करन्सीमधून कमाईची माहिती द्यावी लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.
"क्रिप्टोकरन्सीमधून मिळणारा नफा हा नेहमीच करपात्र असतो आणि अर्थसंकल्पात जो प्रस्तावित करण्यात आला आहे तो नवीन कर नसून या विषयावर निश्चितता आहे. आम्ही करात निश्चितता आणत आहोत. आता कमाईवर ३० टक्के कर लागेल, ज्याची माहिती गुंतवणूकदार ITR फॉर्ममध्ये देऊ शकतील," असं बजाज म्हणाले.
२०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सी आणि इतर डिजिटल मालमत्तांच्या व्यवहारांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर लावण्यात आला आहे. यासोबतच मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांवर एक टक्का टीडीएस (स्रोतावर कर वजा) लावण्याचाही प्रस्ताव आहे. टीडीएसशी संबंधित तरतुदी १ जुलै २०२२ पासून लागू होतील, तर क्रिप्टोवरील कर १ एप्रिलपासून लागू केला जाईल.
सीबीडीटीचं मोठं विधानयापूर्वी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष जे बी महापात्रा यांनी क्रिप्टोकरन्सीच्या कायदेशीर वैधतेवर मोठे विधान केले होते. क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल मालमत्तांमध्ये व्यापार करणे केवळ तुम्ही कर भरला आहे म्हणून कायदेशीर ठरत नाही," असे ते म्हणाले. क्रिप्टोकरन्सीसाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.