- प्रसाद गो. जोशी
घसरलेले औद्योगिक उत्पादन, खनिज तेलाच्या दरामध्ये पुन्हा सुरू झालेली वाढ, परकीय गुंतवणूकदारांकडून होत असलेली विक्री आणि गुंतवणूकदारांनी स्वीकारलेला सावध पवित्रा यामुळे गतसप्ताहात बाजारातील वातावरण तसे थंडच होते. मात्र त्यातही दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये झालेली वाढ आणि निफ्टीने १० हजार ९०० अंशांची पातळी राखण्यात मिळविलेले यश हीच या सप्ताहामधील जमेची बाजू मानावी लागेल. मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ संवेदनशील निर्देशांक सुमारे १०० अंशांपेक्षा अधिक वाढीव पातळीवर खुला होऊन झाला. त्यानंतर तो ३६,४६९.९८ ते ३५,६९१.७५ अंशांदरम्यान वर-खाली हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ३६,३८६.६१ अंशांवर बंद झाला. गतसप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ३७६.७७ अंशांची म्हणजेच सुमारे एक टक्का वाढ झाली आहे.
राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्येही सप्ताहात चढ-उतार दिसून आली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक १०,९०१.९५ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यात १०७ अंशांनी (सुमारे एक टक्का) वाढ झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र घट झालेली दिसून आली. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप १४७.६४ अंशांनी खाली येऊन १५,०२३.३९ अंशांवर तर स्मॉलकॅप निर्देशांक ९५.७७ अंशांनी कमी होत १४,५०४.६० अंशांवर बंद झाला आहे.
गतसप्ताहामध्ये जाहीर झालेली औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी निराशाजनक होती. नोव्हेंबर महिन्यात देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये ०.५ टक्कयांची घट होऊन ते १७ महिन्यांमधील नीचांकी पोहोचले. घाऊक आणि किरकोळ मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दरामध्येही घट झाली आहे. मात्र खनिज तेलाच्या किंमती आता पुन्हा वाढू लागल्याने बाजारात चिंता व्यक्त होत आहे. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर जाहीर झालेल्या विप्रो आणि एचडीएफसी बॅँकेच्या
तिमाही निकालांवरील प्रतिक्रिया आज कळेल.
१०९०० अंशांची पातळी राखण्यात निफ्टीला यश
घसरलेले औद्योगिक उत्पादन, खनिज तेलाच्या दरामध्ये पुन्हा सुरू झालेली वाढ, परकीय गुंतवणूकदारांकडून होत असलेली विक्री आणि गुंतवणूकदारांनी स्वीकारलेला सावध पवित्रा यामुळे गतसप्ताहात बाजारातील वातावरण तसे थंडच होते.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 02:34 AM2019-01-21T02:34:40+5:302019-01-21T02:34:52+5:30