प्रसाद गो. जोशीआर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या मोठ्या विक्रीमुळे निर्देशांक खाली आला असला तरी सप्ताहाचा विचार करता तो वाढला. अमेरिकन अध्यक्षांची धोरणे स्पष्ट झालेली नसल्याने जगभरातील बाजारांमध्ये अस्थिरता होती. मात्र जीएसटीची चार विधेयके मंजूर झाल्यामुळे बाजारात उत्साह निर्माण झाला. यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ने सलग दुसऱ्या सप्ताहात नवीन उच्चांकाची नोंद केली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकामध्ये गतसप्ताहामध्ये १९९.१० अंशांनी वाढ होऊन तो २९,६२०.५० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ६५.७५ अंशांनी वाढून ९१७३.७५ अंशांवर बंद झाला. निफ्टीने सलग दुसऱ्या सप्ताहामध्ये नवीन उच्चांकाची नोंद केली आहे. सप्ताहाच्या अखेरीस डेरिव्हेटीव्हजची सौदापूर्ती असल्यामुळे थोड्या प्रमाणात विक्रीचा दबाब असला तरी आगामी महिना तेजीचा राहण्याचे संकेत त्यामधून मिळाले आहेत. जीएसटी विधेयकांच्या मंजुरीमुळे आर्थिक क्षेत्रामध्ये चैतन्याचे वातावरण आले आहे.आर्थिक वर्षामध्ये परकीय वित्तसंस्थांनी बाजारामध्ये चांगली गुंतवणूक केलेली दिसून आली. या संस्थांनी समभागांमध्ये ५५७०३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली तर कर्जरोख्यांमधून ७२९२ कोटी रुपये काढून घेतले आहेत. याचाच अर्थ वर्षभरामध्ये या संस्थांनी बाजारात ४८४११ कोटी रुपये गुंतविले आहेत. आधीच्या आर्थिक वर्षामध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारामधून १८,१७६ कोटी रुपये काढून घेतले होते. ब्रेक्झीट, अमेरिकेमध्ये ट्रम्प यांची झालेली निवड, युरोपियन युनियनमधील मंदीचे वातावरण, अमेरिकेतील व्याजदरवाढीची अनिश्चितता यामुळे या संस्थांची भारतातील गुंतवणूक वाढली आहे.
निफ्टीच्या नवीन उच्चांकाने वर्षाची सांगता
By admin | Published: April 03, 2017 4:33 AM