Join us

निफ्टी पहिल्यांदाच 25000 पार, तर सेन्सेक्स 81867 अंकांवर बंद; एनर्जी शेअर्स वधारले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 4:24 PM

आजच्या व्यवहाराअंती निफ्टी 59.75 अंकांच्या उसळीसह 25,010.90 अंकांवर बंद झाला, तर सेन्सेक्स 126 अंकांच्या उसळीसह 81,867.55 अंकांवर बंद झाला.

Stock Market Closing On 1 August 2024 : ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस(1 ऑगस्ट) शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीने पहिल्यांदाच 25,000 आणि बॉम्बे स्टॉक एक्सजेंजच्या सेन्सेक्सने 82,000 चा टप्पा ओलांडून ऐतिहासिक उच्चांक गाठला. बाजारातील या वाढीचे श्रेय ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सना जाते. कोल इंडिया, ओएनजीसी पॉवर ग्रिड या सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. आजच्या व्यवहाराअंती निफ्टी 59.75 अंकांच्या उसळीसह 25,010.90 अंकांवर बंद झाला, तर सेन्सेक्स 126 अंकांच्या उसळीसह 81,867.55 अंकांवर बंद झाला.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्सआजच्या व्यवहारात ऊर्जा शेअर्सचे वर्चस्व राहिले. या क्षेत्रातील शेअर्सवर नजर टाकल्यास पॉवर ग्रिड 3.37 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी 3.16 टक्के, टाटा पॉवर 2.51 टक्के, ओएनजीसी 2.03 टक्के, एनटीपीसी 1.83 टक्के, रिलायन्स 0.75 टक्के वाढीसह बंद झाले. याशिवाय एचडीएफसी बँक 1.85 टक्के, नेस्ले 1.38 टक्के, अदानी पोर्ट्स 1.07 टक्के, मारुती सुझुकी 1.01 टक्के, भारती एअरटेलदेखील 0.66 टक्के वाढले. घसरणाऱ्या शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा 2.76 टक्के, टाटा स्टील 1.36 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.20 टक्के, एसबीआय 1.20 टक्के घसरले. 

सेक्टोरिअल अपडेटआजच्या व्यवहारात एनर्जी, फार्मा, एफएमसीजी, हेल्थकेअर बँकिंग आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली, तर ऑटो, आयटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, मेटल, रिअल इस्टेट आणि मीडिया शेअर्स घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या तेजीला आज ब्रेक लागला. सेन्सेक्समधील 30 पैकी 15 शेअर्स वाढीसह आणि 15 घसरणीसह बंद झाले. तर, निफ्टीच्या 50 पैकी 28 शेअर्स वाढीसह आणि 22 तोट्यासह बंद झाले.

मार्केट कॅपमध्ये घसरणभारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपने बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात विक्रमी उच्चांक गाठला होता, मात्र आजच्या सत्रात त्यात घसरण दिसून आली. BSE वर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 461.61 लाख कोटी रुपयांवर बंद झाले.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक