- प्रसाद गो. जोशी
शेअर बाजारामध्ये असलेली तेजी गतसप्ताहामध्येही कायम राहिली असून सातत्याने वाढत असलेल्या बाजाराने सहा महिन्यांमधील उच्चांकापर्यंत धडक मारली आहे. बाजारामध्ये सातत्याने होत असलेली गुंतवणूक बाजाराच्या वाढीला हातभार लावत आहे.
मुंबई शेअर बाजाराचा प्रारंभ गतसप्ताहातही वाढीव पातळीवर झाला. त्यानंतर संवेदनशील निर्देशांक ३९,५७९.५८ ते ३८,५४५.७६ अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाची अखेर वाढीने झाली. राष्टÑीय शेअर बाजारामध्येही अशीच स्थिती दिसून आली. निफ्टीमध्येही चांगली वाढ झालेली दिसून येत आहे.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये गतसप्ताहामध्ये ही चांगली वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये सातत्याने चांगली वाढ होत असून त्यामधील गुंतवणुकीसाठी मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे.
भारतीय रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतीय अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रिझर्व्ह बॅँक समर्थ असल्याचे केलेले प्रतिपादन बाजाराला नवीन बळ देऊन गेले. त्याचप्रमाणे विविध कंपन्यांमध्ये सुरू झालेले उत्पादन आणि बाजारातील वाढत असलेली मागणी यामुळे शेअर बाजारामध्येही चांगले वातावरण निर्माण झाले आहे. बाजारात गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत.
जागतिक पातळीवरही कोरोनावरील लस सापडण्याची वाढत असलेली शक्यता, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने पॅकेज वाढविण्याची दाखविलेली तयारी आणि चीनमधील उत्पादनाची सुरळीत होत असलेली प्रक्रिया यामुळे तेजीचे वातावरण राहिले. त्यामुळे अमेरिका आणि युरोपसह आशियामधील शेअर बाजारांमध्ये चांगले वातावरण असलेले दिसून आले.
परकीय वित्तसंस्थांनी केली जोरदार खरेदी
मार्च महिन्यानंतर काही अपवाद वगळता परकीय वित्तसंस्थांनी सातत्याने खरेदी केलेली दिसून येत आहे. गतसप्ताहामध्येही या संस्थांनी ५००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या शेअर्सची खरेदी केली. देशांतर्गत वित्तसंस्थांनी २,६०० कोटी रुपयांची विक्री केली आहे. आॅगस्ट महिन्यामध्ये या संस्थांची विक्री ११,७०० कोटी रुपयांची आहे.
‘निफ्टी’चा सहा महिन्यांमधील उच्चांक
शेअर बाजारामध्ये असलेली तेजी गतसप्ताहामध्येही कायम राहिली असून सातत्याने वाढत असलेल्या बाजाराने सहा महिन्यांमधील उच्चांकापर्यंत धडक मारली आहे. बाजारामध्ये सातत्याने होत असलेली गुंतवणूक बाजाराच्या वाढीला हातभार लावत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 05:51 AM2020-08-31T05:51:03+5:302020-08-31T05:51:27+5:30