मुंबई : मजबूत तिमाही निकाल आणि जागतिक पातळीवरील तेजी यामुळे मंगळवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सार्वकालिक उच्चांकावर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३0 हजार अंकांच्या उंबरठ्यावर उभा आहे.५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ८८.६५ अंकांनी अथवा 0.९६ टक्क्यांनी वाढून ९,३0६.६0 अंकांवर बंद झाला. हा निफ्टीचा सार्वकालिक उच्चांकी बंद ठरला आहे. याआधी ५ एप्रिल रोजी निफ्टी ९,२६५.१५ अंकांवर बंद झाला होता. ३0 कंपन्यांचा सेन्सेक्स २८७ अंकांनी वाढून २९,९४३.२४ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा तीन आठवड्यांचा उच्चांक आहे. काल सेन्सेक्स २९0.५४ अंकांनी वाढला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग १.१४ टक्क्यांनी वाढला. चौथ्या तिमाहीत कंपनीने विक्रमी ८,0४६ कोटींचा नफा कमावल्याचे काल जाहीर करण्यात आले होते. त्याचा लाभ कंपनीला मिळाला. आशियाई बाजारांपैकी चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान यांचे निर्देशांक 0.१६ टक्के ते १.३१ टक्के वाढले. युरोपीय बाजारांतही सकाळी तेजीचा कल दिसून आला. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार 0.0३ टक्के ते 0.१८ टक्क्यांपर्यंत वाढले.
निफ्टीने गाठला सार्वकालिक उच्चांक
By admin | Published: April 26, 2017 12:50 AM