मुंबई : ब्लू-चीप कंपन्यांचा उत्तम तिमाही निकाल आणि देशाच्या अनेक भागांत अग्रेसर असलेला मान्सून यामुळे राष्टÑीय शेअर बाजाराच्या निफ्टीने मंगळवारी १० हजार अंकांच्या ऐतिहासिक पातळीला स्पर्श केला. सेन्सेक्स ऐतिहासिक उंचीवर पोहोचला होता. तथापि, नफा वसुलीमुळे दोन्ही निर्देशांक नंतर घसरणीसह बंद झाले.मजबूत वाढीच्या बळावर निफ्टी १०,०११.३० या अंकावर पोहोचला होता. इतिहासात पहिल्यांदाच तो १० हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेला होता. त्यानंतर मात्र नफा वसुलीचे सत्र सुरू झाले आणि निर्देशांक घसरणीला लागला. सत्राच्या अखेरीस निफ्टी १.८५ अंकाच्या घसरणीसह ९,९६४.५५ अंकावर बंद झाला.विदेशी संस्थांची जोरदार खरेदी आणि मान्सूनचा देशाच्या अनेक भागांतील जोर यामुळेही बाजारात उत्साह होता, असे सूत्रांनी सांगितले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२,३७४.३० अंकांपर्यंत वर चढला होता. नंतर मात्र तो १७.६० अंकांच्या घसरणीसह ३२,२२८.२७ या अंकावर बंद झाला.
निफ्टीचा १० हजार अंकांना स्पर्श; सेन्सेक्स नव्या उंचीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 4:27 AM