Join us

"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 10:26 AM

Zerodha Nikhil kamath : वारसा पुढे नेण्यासाठी मुलं जन्माला घालण्याची पारंपरिक कल्पना आपल्याला योग्य वाटत नसल्याचं म्हणत सामाजिक कार्याकडे अधिक लक्ष देण्यावरही त्यांनी भर दिला.

ऑनलाइन ब्रोकिंग फर्म झिरोदाचे (Zerodha) संस्थापक निखिल कामथ (Nikhil Kamath) यांना वडील होण्यात स्वारस्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. निखिल कामत यांच्या मते, वारसा पुढे नेण्यासाठी मुलं जन्माला घालण्याची पारंपरिक कल्पना त्यांना योग्य वाटत नाही. यासोबतच सामाजिक कार्याकडे अधिक लक्ष देण्यावरही त्यांनी भर दिला. 

काय म्हणाले निखिल कामत? 

त्यांनी आपल्या पॉडकास्ट डब्ल्यूटीएफच्या एका एपिसोडमध्ये वडील होण्याच्या विचाराबद्दल सांगितलं आहे. आपण आपल्या सध्याच्या कामांना प्राधान्य देत असल्याचं निखिल कामथ म्हणाले. "माझ्या आयुष्याचा मोठा भाग मुलाच्या संगोपनात घालवण्याची मला गरज वाटत नाही. मला मुलं नसण्याचं हेही एक मोठं कारण आहे," असं त्यांनी नमूद केलं. 

... तर त्याचा अर्थ नाही 

"मुलांचं संगोपन करताना मी माझ्या आयुष्याची १८-२० वर्ष वाया घालवेन, पण जर मुल १८ व्या वर्षी सोडून गेलं तर काय होईल. वारसा चालवण्यासाठी कोणाला आपल्या मागे सोडण्याच्या पारंपारिक विचाराशी आपण सहमत नाही," असं कामथ म्हणाले. "मृत्यूनंतर आपण कोणाच्या स्मरणात राहू यासाठी मुल जन्माला घालणं, हे माझ्या मूल्यांवर आधारित नाही. मला वाटतं तुम्ही या पृथ्वीवर यावं, चांगल्या प्रकारे राहावं आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या लोकांसोबत चांगल्या प्रकारे वागावं," असं त्यांनी स्पष्ट केलं.  

सामाजिक कार्यावर भर द्या 

"मी ३७ वर्षांचा आहे आणि जर एखाद्या भारतीयाचं सरासरी वयोमान ७२ वर्ष असेल तर माझ्याकडे अजून ३५ वर्ष आहे. बँकांमध्ये पैसे सोडण्याचं काही मूल्य नाही. यासाठी मी आपला वेळ आणि पैसे ज्या गोष्टी मला आवडत्यात त्यावर खर्च करण्यासाठी प्राधान्य देईन. यासाठी मी गेल्या २० वर्षांमध्ये जे कमावलंय किंवा पुढच्या २० वर्षांत कमावेन ते सामाजिक कार्यासाठी देईन," असंही निखिल कामथ म्हणाले. 

झिरोदाचे संस्थापक नितीन कामथ हे गिविंग प्लेजचा हिस्सा बनणारे सर्वात कमी वयाचे भारतीय ठरले होते. त्यांनी आपली बहुतांश संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान केली. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी, बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार शॉ आणि विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांना कामथ यात आपलं प्रेरणास्थान मानतात.

टॅग्स :व्यवसाय