निखील कामथ आज भारतातील सर्वात कमी वयाचा अब्जाधीश आणि देशातील मोठा उद्योग ब्रोकरेज जेरोधा (Zerodha) चे सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु खूप कमी जणांना माहिती असेल की, शाळा सोडल्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी निखील कामथ यांनी व्यवसाय करण्यास सुरूवात केली. ३४ वर्षीय निखील कामथ यांनी ह्यूमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत त्यांचे बालपण आणि अब्जाधीश बनण्याचा प्रवास कसा केला याची माहिती दिली.
निखील कामथ यांनी सांगितले की, लहानपणी त्यांना शाळेत जाणं आवडत नसे. जर तुम्हाला काही करायचं असेल तर फक्त ते करावं, वेळेसोबत मला शिक्षणाबद्दलची गोडी कमी झाली. त्यानंतर मी बुद्धिबळ खेळण्यास सुरूवात केली. निखीलने १४ व्या वर्षी एका मित्रासोबत मिळून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. यात त्यांनी सेकंड हँड मोबाईल खरेदी करून विकण्यास सुरूवात केली. जेव्हा ही गोष्ट त्यांच्या आईला समजली तेव्हा त्यांनी हा व्यवसाय बंद केला. शाळेमुळे मला व्यवसाय बंद करावा लागला त्यामुळे मी शाळेचा राग करू लागलो. जेव्हा मला शाळेतून बाहेर काढलं तेव्हा माझं एकच लक्ष्य होतं ते म्हणजे पैसे कमवणे
१७ व्या वर्षी एका नोकरीसाठी मला कॉल आला. त्यानंतर प्रेयसीसोबत राहण्यासाठी मी घराबाहेर पडलो. कॉल सेंटरमध्ये संध्याकाळी ४ ते रात्री १ पर्यंत काम करावं लागत. त्यामुळे सकाळच्या वेळेत त्यांनी व्यवसायात नशीब आजमवायचं ठरवलं. शिक्षणाशिवाय मला कुठेही नोकरी मिळणार नव्हती. तेव्हा माझ्या भावासोबत मिळून मी जेरोधा सुरू केलं. त्यानंतर हळूहळू प्रगती झाली आणि फोर्ब्स इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत माझा समावेश झाला असं निखील कामथ यांनी सांगितले.
वयाच्या १८ व्या वर्षी निखील यांनी स्टॉक ट्रेडिंग सुरू केली. वडिलांनी बचतीच्या पैशातून काही पैसे दिले त्यातून मला काम सुरू करण्यास सांगितले. माझ्यावर वडिलांनी विश्वास ठेवला. त्यानंतर कॉल सेंटरमधील बॉस आणि सहकाऱ्यांकडून पैशाचं नियोजन केले. त्यानंतर मोठा भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत कामथ असोसिएट्स सुरू करण्यासाठी कॉल सेंटरचा जॉब सोडला. २०१० मध्ये त्यांनी बचतीच्या पैशातून जेरोधा सुरू केलं. ब्लूमबर्गनुसार, आज जेरोधाची आर्थिक उलाढाल ३५ अब्ज असेल. जेरोधा ही देशातील पहिली ऑनलाईन ब्रोकरेज फर्म आहे. कमी गुंतवणुकीत सुरू झालेली ही कंपनी रिटेल शेअर ब्रोकिंगचं काम करते. परंतु आज ही कंपनी इक्विटी, बॉन्ड, करेंसी, कमॉडिटी, म्युचूअल फंडमध्ये ट्रेडिंग ऑफर करते. या कंपनीचं विशेष म्हणजे ब्रोकरेज चार्ज घेत नाहीत पण प्रत्येक ट्रेडसाठी २० रुपये चार्ज घेतात. मग ती ट्रेडिंग मोठी असो वा छोटी..