Join us

नीलेकणी अर्धी संपत्ती करणार दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 4:52 AM

इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि चेअरमन नंदन नीलेकणी त्यांची पत्नी रोहिणी नीलेकणी आणि इतर तीन भारतीय वंशाच्या उद्योगपतींनी बिल गेट्स

न्यूयॉर्क : इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि चेअरमन नंदन नीलेकणी त्यांची पत्नी रोहिणी नीलेकणी आणि इतर तीन भारतीय वंशाच्या उद्योगपतींनी बिल गेट्स, त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स आणि वॉरेन बफेट यांच्या दानयज्ञात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ते आपली अर्धी संपत्ती दान करणार आहेत.नीलेकणी पती-पत्नी यांच्याशिवाय अनिल व अलिसन भुसरी, शमशीर व शबीना वायलील आणि बी.आर. शेट्टी व त्यांच्या पत्नी चंद्रकुमारी रघुराम शेट्टी ही उद्योगपती जोडपी गेट्स आणि बफेट यांच्या पुढाकारात सहभागी होणार आहेत. मागील वर्षभरात एकूण १४ उद्योगपती यात सहभागी झाले असून, यातील सहभागी अब्जाधीशांची संख्या आता १८३ झाली आहे. २०१० साली ४० अमेरिकी दानशूरांसह हा पुढाकार घोषित करण्यात आला होता. आतापर्यंत २२ देशांतील दानशूर अब्जाधीश त्यात सहभागी झाले आहेत.वॉरेन बफेट यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. गेट्स-बफेट पुढाकाराचे हे आठवे वर्ष आहे. कॅनडा, भारत, संयुक्त अरब अमिरात व अमेरिका यांसह जगभरातील दानशूरांनी त्यात हिरिरीने सहभाग घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. अब्जाधीशांना आपली अर्धी संपत्ती दान करण्याचे आवाहन या पुढाकारांतर्गत करण्यात आले आहे.बफेट म्हणाले की, गेल्या आठ वर्षांत आम्ही समर्पित दानशूरांमुळे प्रभावित झालो आहोत. आपली अर्धी संपत्ती दान करण्याच्या बाबतीत ते अत्यंत भावनाशील आहेत.जगातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावण्याची त्यांना आस आहे. यंदाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही त्यांचे स्वागत करतो.