- उमेश शर्मा (सीए)
(करनीती भाग-३0६)
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जसे नवरात्रीत नऊ रात्रींचे महत्त्व असते त्याचप्रमाणे जीएसटीत ९ मुख्य बदल करण्यात आले आहेत. जाहीर केलेल्या अधिसूचना कधीपासून लागू आहेत?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, आज नवरात्रीचा नववा दिवस आहे. सरकारने जीएसटीत वेगवेगळ्या अधिसूचना जाहीर केल्या गेल्या आहेत. सर्व बदल १ ऑक्टोबर २०१९ पासून लागू होतील. आपण त्यातील ९ मुख्य बदलांचा अभ्यास करूया.
अर्जुन : कृष्णा, हे होणारे ९ मुख्य बदल कोणते?
कृष्ण : अर्जुना, हे ९ मुख्य बदल खालीलप्रमाणे :
१) भाड्याने दिलेल्या मोटर वाहनांवरील आरसीएम : जर वैयक्तिक/फर्म/एल़पी़ने कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीला सेवा पुरवली गेली तर त्यावर ५ टक्के दराने आरसीएम लागू होईल. तथापि सेवा प्रदात्याने १२ टक्के दराने जीएसटी भरला असेल तर सेवा प्रदाता फॉरवर्ड चार्ज आधारावर कर भरतील.
२) जहाज आणि विमानाद्वारे निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीच्या सेवेवरच्या सवलतीत मुदतवाढ : जहाज आणि विमानाद्वारे निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीस क्लीअरन्स ते भारताबाहेर जाण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत सूट देण्यात आली होती. परंतु ही सूट ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.
३) एअररेटेड पाण्याच्या (शीतपेय) उत्पादकांना कम्पोझिशन स्कीमचा पर्याय नाही : एअररेटेड पाण्याचे उत्पादक १ ऑक्टोबर २०१९ पासून कम्पोझिशन स्कीमचा पर्याय निवडू शकणार नाहीत.
४) इतर कृषी उत्पादनांच्या गोदाम भाड्यांवरील सूट : धान्य, कडधान्य, फळे, शेंगदाणे, भाज्या इत्यादींच्या गोदामाच्या भाड्यांवर जीएसटीत सूट देण्यात आली आहे.
५) जॉब वर्क सेवा : अभियांत्रिकी उद्योगातील मशीन जॉब वर्कच्या पुरवठ्याचा जीएसटी दर १८ वरून १२ टक्के करण्यात आला आहे. नॉन मॅन्यूफॅक्चरिंग जॉब वर्कवरील कर दर १२ टक्के करण्यात आला आहे, परंतु मॅन्यूफॅक्चरिंग जॉब वर्कसाठी १८ टक्के दर लागू असेल.
६) हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन :
अ) हॉटेल निवास सेवांचे जर व्यवहार मूल्य रु. १००० प्रतिदिन असेल तर त्यावर शून्य दराने जीएसटी लागू होईल आणि व्यवहार मूल्य रु. १००० प्रतिदिनपेक्षा जास्त असेल तर त्यावर रु. ७५०० प्रतिदिनपेक्षा कमी असेल तर त्यावर १२ टक्के दराने जीएसटी लागू होईल.
ब) दिवसाच्या ७,५०१ रुपये निवासस्थानाच्या युनिटचे भाडे असणाऱ्या प्रिमायसेसच्या जागेव्यतिरिक्त बाह्य कॅटरिंग सेवांवरील जीएसटी करदर आयटीसीसह १८ टक्क्यांवरून आयटीसीव्यतिरिक्त ५ टक्के करण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या केटरिंगसाठी हा दर अनिवार्य आहे.
क) केटरिंगची सेवा प्रिमायसेसमध्ये प्रतिदिन ७,५०१ आणि जास्त दराने पुरवली असेल तर त्यावर आयटीसीसह १८ टक्के दरानेच जीएसटी लागू होईल.
७) सुकी चिंच आणि पाने/फुले/झाडांच्या सालांपासून बनवलेल्या प्लेट्स आणि कप यांवर जीएसटी दर ५ टक्क्यांवरून शून्य करण्यात आला आहे.
८) कॅफिनयुक्त पेयांवरील जीएसटी दर १८ टक्क्यांवरून २८ टक्के अधिक १२ टक्के कम्पनसेशन सेस इतका करण्यात आला आहे.
९) हिऱ्याव्यतिरिक्त इतर मौल्यवान वस्तूंवरील जीएसटी दर ३ टक्क्यांवरून 0.२५ टक्के करण्यात आला आहे.
अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून नेमका काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, जसे दसऱ्याला दुष्ट आणि अनिष्ट प्रवृत्तींवर विजय प्राप्त करून दसरा साजरा केला जातो तसेच जीएसटीतील जाचक अटी वगळता चांगली आणि सहज कर प्रक्रिया येईल, अशी आशा करूया.