नवी दिल्ली : भारतातून पळ काढलेला पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीच्या 12 लक्झरी गाड्यांचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला आहे. या लिलावात सक्तवसुली संचालनालयाला (Enforcement Directorate अर्थात ED) 3.29 कोटी मिळाले आहेत. हा लिलाव मेटल अँड स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशनने केला.
सक्तवसुली संचालनालयामार्फत नीरव मोदीच्या गाड्यांचा लिलाव करण्यात येत आहे. गेल्यावर्षी या गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. यामध्ये एक सिल्व्हर रंगाची रॉल्स रॉयल (आरक्षित किंमत 1,33,00,000 रुपये), एक पोर्शे (आरक्षित किंमत 54,60,000 रुपये), लाल रंगाची मर्सिडिज बेंज (आरक्षित किंमत 14,00,000 रुपये), पांढऱ्या रंगाची मर्सिडिज बेंज (आरक्षित किंमत 37,80,000 रुपये) आणि एक बीएमडब्ल्यू (आरक्षित किंमत 9,80,000) अशा गाड्यांचा समावेश आहे.
याशिवाय, दोन होंडा ब्रायो, टोयोटा इनोव्हा, होंडा सीआरव्ही, टोयोटा फॉर्च्युनर, स्कोडा सुपर्ब एलेगेंस, टोयोटा कोरोला एल्टिस आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा या सुद्धा गाड्या आहेत. या 13 गाड्यांमधील बीएमडब्ल्यू आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा मेहुल चोक्सीची आहे आणि बाकीच्या नीरव मोदी, कुटुंब आणि समूहाच्या कंपनीच्या आहेत. लिलावाआधी संभाव्य खरेदीदारांसाठी या आठवड्याच्या सुरुवातीला वेगवेगळ्या जागांवर गाड्यांची तपासणी करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.
As per PMLA Court’s order 12 vehicles (10 vehicles of Nirav Modi Group and 2 vehicles of Mehul choksi Group) were successfully bidded for ₹ 3.29 Crore (approx.) in e-auction conducted through MSTC.
— ED (@dir_ed) April 26, 2019
दरम्यान, पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी फरार झालेल्या नीरव मोदीला ब्रिटनमध्ये मार्च महिन्यात अटक करण्यात आली आहे. आज त्याच्या जामीन अर्जावर लंडनमधील न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने नीवर मोदीचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणी 24 मे रोजी होणार आहे.