Join us

जगातल्या 100 सर्वाधिक प्रभावशाली महिलांमध्ये निर्मला सीतारामण, फोर्ब्सकडून यादी प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 4:12 PM

Forbes List: देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी निर्मला सीतारामण करत असलेल्या प्रयत्नांना भलेही यश आलेलं नसेल, पण त्यांच्या कामाची चर्चा जागतिक स्तरावर होत आहे.

नवी दिल्लीः देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी निर्मला सीतारामण करत असलेल्या प्रयत्नांना भलेही यश आलेलं नसेल, पण त्यांच्या कामाची चर्चा जागतिक स्तरावर होत आहे. फोर्ब्सनं निर्मला सीतारामण यांना जगातल्या 100 सर्वाधिक प्रभावशाली महिलांमध्ये स्थान दिलेलं आहे. या यादीत HCL कॉर्पोरेशनच्या सीईओ रोशनी नडार मल्होत्रा, बायोकॉनची संस्थापक किरण मजुमदार शॉ या भारतीय महिलांचाही समावेश आहे. भारतातल्या महिला अर्थमंत्री असलेल्या सीतारामण या यादीत 34व्या क्रमांकावर आहेत. तर रोशनी नडार मल्होत्रा यांना 54वं स्थान बहाल करण्यात आलेलं आहे. तसेच किरण मजूमदार शॉ यांनी 65वं स्थान देण्यात आलं आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी काही काळासाठी अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर अर्थमंत्रिपद सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामण या दुसऱ्या महिला आहेत.  यापूर्वी निर्मला सीतारामण या संरक्षण मंत्रीसुद्धा राहिलेल्या आहेत. जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मॉर्केल या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत. गेल्या 9 वर्षांपासून फोर्ब्सकडून प्रसिद्ध करण्यात येणार यादीत त्यांनी पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. दुसऱ्या स्थानी युरोपियन सेंट्रल बँकेची अध्यक्षा क्रिस्टिन लेगार्ड आहेत. अमेरिकेच्या सिनेटर नॅन्सी पलोसी या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत.तसेच भारताचा शेजारील देश असलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना या यादीत 29व्या स्थानी आहेत. त्याशिवाय मिलिंडा गेट्स सहाव्या स्थानी, आयबीएमची सीईओ गिनी रोमेटी नवव्या स्थानी कायम आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अँड्रेन 38व्या स्थानी,  डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प 42व्या स्थानी, गायिका रिहाना 61व्या स्थानी, बियोन्स 66व्या स्थानी, टेलर स्विफ्ट 71व्या स्थानी, टेनिस स्टार सेरेना विलियम्स 81व्या स्थानी, हवामान तज्ज्ञ क्टिविस्ट ग्रेट थनबर्ग 100व्या स्थानी विराजमान आहे. 

टॅग्स :निर्मला सीतारामनफोर्ब्स