नवी दिल्ली : बँकांची कर्जे बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्या विजय मल्ल्या, नीरव माेदी यांच्या मालमत्ता केंद्रीय तपास यंत्रणांनी ताब्यात घेतल्या असून, त्यातून देशातील बँकांनी आतापर्यंत १३ हजार १०९ कोटी वसूल केले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत ही माहिती दिली.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त म्हणाल्या की केंद्रीय यंत्रणांनी मनी लाँडरिंग कायद्यान्वये त्यांची मालमत्ता ताब्यात घेतली. त्यातून इतक्या रकमेची वसुली झाली आहे. विजय मल्ल्या याने भारतीय बँकांचे कर्ज व त्यावरील व्याज मिळून सुमारे ९ हजार कोटी रुपये देणे आहे, तर हिरे व्यापारी नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी पंजाब नॅशनल बँकेची १३ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले
आहे. याशिवाय गेल्या सात वर्षांत ५ लाख ४९ हजार कोटी रुपयांची कुकर्जे वसुल करण्यात यश आले.