इंधनाच्या वाढत्या दरांमुळे आता साध्या साध्या गोष्टीदेखील महाग होऊ लागल्या आहेत. केशकर्तनालयापासून ते अगदी दूध, साखर, तेलापर्यंत साऱ्याच वस्तू महागल्याने त्याचा परिणाम आता अन्य सेवांवरही दिसू लागला आहे. महिन्याभराचा बाजार भरणारे लोक तर पुढील महिन्यात बाजार भरायला गेले तर त्यांचे बिलही अव्वाचे सव्वा वाढू लागले आहे. असे असताना केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची यावरील प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे.
महागाईवरनिर्मला सीतारामन यांनी काही वर्षांपूर्वी मी खूप कांदा खात नाही, त्यामुळे दर माहिती नाहीत, अशा प्रकारची प्रतिक्रिया देत सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. आताही तसाच काहीसा प्रकार त्यांनी केला आहे. भारतात महागाईचा दर खूप जास्त नाहीय, अशा शब्दांत त्यांनी महागाई नसल्याचे म्हटले आहे. हे वक्तव्य त्यांनी अमेरिकेत केले आहे.
अर्थमंत्री सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. वाशिंगटन डीसीमध्ये एका कार्यक्रमाला त्यांनी म्हटले की, आमच्या समोर आंतरराष्ट्रीय आव्हाने आहेत. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत आणि वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. सर्वच अर्थव्यवस्थांवर याचा परिणाम होणार आहे. तरीही भारतात महागाई दर 6.9 टक्केच आहे. आमचा अंदाज ४ टक्के होता. यामध्ये दोन टक्के मागे पुढे होण्याची शक्यता असते. भारताने ६ टक्के पार केला आहे परंतू त्याच्या खूप पुढे गेलेला नाही, असे त्या म्हणाल्या.
वाढत्या किमतीचा बोजा सर्वसामान्यांवर पडत असून, सरकार त्या ताणातून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू आव्हानांना तोंड देत आपण प्रणाली आणि प्रक्रिया सुधारणांसह पुढे जात आहोत. जेव्हा कोरोना महामारीचा फटका बसला तेव्हा आम्हाला पायाभूत सुविधांच्या उभारणीवर खर्च करणे हा अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी सर्वात चांगला पर्याय ठरेल असे वाटले, यानुसार आम्ही कोरोना काळात काम केले, असेही त्या म्हणाल्या.