Join us  

“ABG घोटाळा मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील”; निर्मला सीतारामन यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 10:39 PM

एबीजी शिपयार्डच्या कथित २२ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली: भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाची कथितरित्या २२ हजार ८४२ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याबद्दल सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकरणांवरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

यूपीए सरकारच्या कालखंडात एबीजीची सर्व बँक खाती एनपीएमध्ये वर्ग करण्यात आली. बँकांनी वेळेपूर्वीच घोटाळा उघड केल्याने एबीजीवर कारवाई सुरू करण्यात आली. अन्यथा अशा प्रकारचे घोटाळे समोर येण्यासाठी ५२-५६ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाते, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. याशिवाय, हे प्रकरण आता उचलून धरून विरोधक आपल्याच पायावर कुऱ्हाड चालवत असल्याचा टोला सीतारामन यांनी लगावला आहे. 

मोदी काळात ५ लाख ३५ हजार कोटींची बँक फसवणूक

यापूर्वी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली आहे. मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झालेली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतीय जनतेच्या पैशाची एवढी फसवणूक झालेली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. 

दरम्यान, एबीजी शिपयार्ड लिमिटेड या कंपन्यांच्या अनेकविध ठिकाणच्या कार्यालयांवर सीबीआयने छापेमारी केली. यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने तक्रार दाखल केली होती. आत्तापर्यंत उघड झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक मानला जात आहे. एबीजी शिपयार्ड ही कंपनी मोठी जहाजे बांधणे आणि दुरुस्तीच्या व्यवसायात आहे. या कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. 

टॅग्स :निर्मला सीतारामनमनमोहन सिंग