लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद: तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक साक्षरतेची गरज आहे. त्यासाठी मागास भागात बँकांनी मोहीम राबवून जास्तीत जास्त जनधन खाती उघडावित असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. यासोबतच ‘जनधन, आधार आणिमोबाईल लिंकिंग’ या ‘जॅम त्रिसूत्री’मुळे देशात अर्थक्रांती आल्याचे त्यांनी नमूद केले.
औरंगाबादेत गुरुवारी आयोजित सार्वजनिक क्षेत्रातील बँक मंथन परिषदेचे ऑनलाईन उद्घाटन सीतारामन यांच्या हस्ते झाले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर वित्तीय सेवा विभागाचे (डीएफएस) सहसचिव डॉ. बी. के. सिन्हा, इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष राजकिरण राय, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश खारा, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. दास, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सीएच एस. एस.मल्लिकार्जुन राव यांची प्रमुख उपस्थिती होती.
अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणलेल्या ‘जॅम त्रिसूत्री’मुळे आम्हाला जनतेच्या विश्वासाची जोड मिळाली. तळागाळातील लोकांना ‘जनधन’ खात्यामुळे आपले खाते, एटीएम कार्ड मिळाले.यामुळे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण झाला. कोरोना काळात केंद्र सरकारने जनधन खात्यात थेट रक्कम दिल्याने त्याचा मोठा फायदा या जनतेला झाल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. भागवत कराड यांनी सांगितले की, देशात ४३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत. दरम्यानच्या काळात ज्यांचे वय १८ वर्षे झाले त्यांचेही जनधन खाते उघडण्यात यावे. मुद्रा लोनमधील अडचणी सोडविणे, शेतकरी व कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी बँकेकडून सहज कर्ज उपलब्धता आदी विषयांवर या परिषदेत मंथन होईल.
सीतारामन यांच्याकडून डाॅ. कराड यांचे कौतुक
मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागातील प्रश्न जाणून घेऊन येथे सार्वजनिक क्षेत्रातील बँक मंथन परिषद भरविण्यात डाॅ. कराड यांनी घेतलेल्या पुढाकाराचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विशेष कौतुक केले. या परिषदेच्या माध्यमातून ‘जॅम त्रिसूत्री’ सारख्या योजनेची मराठवाड्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून या परिसराचा विकास साध्य करण्याचे त्यांचे उद्दिष्ट वाखाणण्याजोगे आहे, असेही त्या म्हणाल्या.